Madhya Pradesh Assembly Election 2023: लोकसभेपूर्वी देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पैकी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे १७ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. मध्य प्रदेशात २३० सदस्यांच्या विधानसभेसाठी ७३.०१ टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे मतदानाला गालबोट लागले. मात्र, चंबल येथील एका मतदान केंद्रावर गडबड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील चंबल येथे असलेल्या भिंड जिल्ह्यातील अटेर विधानसभा मतदारसंघातील ७१ क्रमांकाचे मतदान केंद्र ताब्यात घेण्यात आले होते, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यासंदर्भात काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेची शहानिशा केल्यानंतर या मतदान केंद्रावर फेरमतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.
अटेर विधानसभा मतदारसंघातील त्या मतदार केंद्रावर फेरमतदान कधी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या दिवशी अटेर विधानसभेच्या किशुपुरा गावातील मतदान केंद्र क्रमांक ७१ येथे बूथ कॅप्चरिंग करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. किशुपुरा हे सपा उमेदवार मुन्ना सिंह भदौरिया यांचे मूळ गाव आहे. या व्हिडिओच्या आधारे सहकार मंत्री आणि अटेर विधानसभेचे भाजपचे उमेदवार अरविंद भदौरिया यांनी निवडणूक आयोगाकडे बुथ ताब्यात घेण्यात आल्याची तक्रार करून फेरमतदानाची मागणी केली होती. या तक्रारीवर निर्णय घेत निवडणूक आयोगाने मतदान केंद्र क्रमांक ७१ वर पुन्हा मतदान घेण्याची तयारी केली आहे. भिंडचे जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव म्हणाले की, अटेर विधानसभेच्या मतदान क्रमांक ७१ येथे २१ नोव्हेंबर रोजी पुन्हा मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, अशी माहिती दिली.
दरम्यान, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी किशुपुराच्या मतदान केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. किशुपुरा येथील मतदान क्रमांक ७१ वर १२२३ पैकी ११०३ मतदारांनी मतदान केले होते. या मतदान केंद्रावर आता नवीन ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणार आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मतदान केंद्राचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे.