लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ : राज्यातील मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात होणार आहे तरी राजकीय निरीक्षकांचे लक्ष बहुजन समाज पक्षाच्या मायावतींकडे लागले आहे. निवडणुकीत बसपला मिळणाऱ्या जागांवर राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकते. २०१८ मध्ये बहुजन समाज पक्षामुळे काँग्रेसला अनेक जागा गमवाव्या लागल्या. निवडणुकीत एकूण २३० जागांपैकी ६८ जागांवर बसपचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी होते. भाजपला १२८ तर काँग्रेसला ९८ जागा मिळाल्या होत्या.
बसप-जीजीपी युतीमुळे टेंशन
या खेपेला बसपने मध्य प्रदेशातील गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत (जीजीपी) आघाडी केली आहे. जीजीपीनेही मागच्या निवडणुकीत बसपप्रमाणेच अनेक ठिकाणी निकाल पलटवून टाकले होते. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी काय करावे, याची रणनीती आखली जात आहे.
‘जीजीपी’मुळे २०१८मध्ये असा बसला फटका
- टिमरनी : काँग्रेसचा २,२१३ मतांनी पराभव झाला. इथे जीजीपीला साडेपाच हजार मते मिळाली होती.
- बिजजपूर : काँग्रेस उमेदवार २,८४० मतांनी पराभूत झाला होता. इथे बसप उमेदवाराला ३७ हजारांहून अधिक मते मिळाली.
‘सायलेंट’ आघाडी काेणावर भारी?
- बसपने १७८ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर, जीजीपीच्या वाट्याला ५२ जागा आल्या आहेत.
- राज्याच्या राजकीय समीकरणाच्या दृष्टीकाेनातून ही आघाडी सर्वात माेठी असून ‘सायलेंट’ आघाडी म्हणूनही त्यास बाेलले जात आहे.
- गेल्या वेळी दाेन्ही पक्ष वेगवेगळे लढले हाेते. त्याचा सर्वाधिक फटका काॅंग्रेसला बसला हाेता. ‘इंडिया’ आघाडीच्या निमित्ताने समाजवादी पार्टीचीही चर्चा हाेत आहे. मात्र, सपापेक्षा जास्त वजन या आघाडीला प्राप्त झाले आहे.
- गेल्या निवडणुकीत बसपला ५.१ टक्के मते मिळाली हाेती. तर केवळ १.३० टक्के मतदान सपाला झाले हाेते.
मते खाल्ली आणि बिघडले गणित
- अटेर : काँग्रेसच्या उमेदवाराचा ५ हजार मतांनी पराभव झाला. बसपाला इथे १६ हजाराहून अधिक मते मिळाली होती.
- कोलारस : काँग्रेसचा उमेदवार अवघ्या ७२० मतांनी जिंकून आला. बसपच्या उमेदवाराला ७ हजार मते मिळाली होती.
- टिकमगड : काँग्रेसने ४,१७५ मतांनी गमावली. इथेही बसपने १० हजारांहून अधिक मते खाल्ली होती.