मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या २३० जागांपैकी तब्बल १६३ जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. तर काँग्रेसला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकीकडे भाजपाने दमदार कामगिरी केली असताना काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मात्र अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. अनेक शिंदे समर्थकांना पराभवाचा सामना करावा लागला.
२०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदेंसोबत २२ आमदार काँग्रेस सोडून भाजपामध्ये आले होते. यापैकी ६ जागांवर भाजपाने शिंदे गटाचे आमदार आणि नेत्यांचं तिकीट कापलं होतं. मात्र यापैकी चार जागांवर इतर शिंदे समर्थकांना संधी देण्यात आली होती. एकंदरीत या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण २० शिंदे समर्थकांना तिकीट देण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना विजय मिळाला तर ९ जण पराभूत झाले.
शिंदेंचे समर्थक असलेले प्रद्युम्न सिंह तोमर, तुलसी सिलावट, प्रभूराम चौधरी, गोविंद सिंह राजपूत, बिसाहूलाल सिंह, हरदीप सिंह डंग, बृजेंद्र सिंह यादव, मनोज चौधरी, ऐंदल सिंह कंषाना, मोहनसिंह राठोड आणि महेंद्र सिंह यादव यांनी विजय मिळवला. तर राज्यवर्धन सिंह दत्तीगांव, महेंद्र सिंह सिसोदिया, सुरेश धाकड राठखेडा, जयपाल सिंह जज्जी, कमलेश जाटव, इमरती देवी, रघुराज सिंह कंषाना, माया सिंह आणि हीरेंद्र सिंह बंटी हे पराभूत झाले.
तर शिंदे राजपरिवाराच्या निकटवर्तीय असलेल्या ७ नेत्यांना यावेळी भाजपानं तिकीट दिलं नव्हतं. त्यामध्ये शिंदे समर्थक आणि शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओपीएस भदौरिया यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं. तर पोटनिवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार मुन्नालाल गोयल, जसवंत जाटव, गिरिराज दंडौतिया, रणवीर जाटव, रक्षा सरौनिया यांनाही भाजपानं तिकीट दिलं नव्हतं.