मध्य प्रदेशात सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने; शिवराजसिंह चौहानांचा आत्मविश्वास दुणावला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:08 AM2023-12-03T10:08:09+5:302023-12-03T10:09:15+5:30
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. लोकसभा निवडणुकांना काही महिने बाकी असताना होत असलेल्या या निवडणुकांमध्ये नक्की कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपला आव्हान देत काँग्रेसने ताकदीने निवडणूक लढवली होती. त्यामुळे या राज्यात सत्ताबदल होणार की भाजपला सत्ता राखण्यात यश येणार, याची उत्सुकता आहे. राज्यात आज सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रतिक्रिया देत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे.
शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करताना म्हटलं आहे की, "भारत माता की जय, जनता जनार्दन की जय... आज मध्य प्रदेशात मतमोजणी पार पडत असून मला विश्वास आहे की, जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे," अशी आशा चौहान यांनी व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
'भारत माता की जय, जनता जनार्दन की जय'
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) December 3, 2023
आज मध्यप्रदेश विधानसभा चुनाव के नतीजे आ रहे हैं और मुझे विश्वास है कि जनता के आशीर्वाद व आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के कुशल नेतृत्व में भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत के साथ फिर सरकार बनाने जा रही है।
भाजपा के सभी…
मध्य प्रदेशात काय आहे स्थिती?
मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची आवश्यकता असते. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ११४ जागा मिळवत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापन करत कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही झाले. मात्र नंतर काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस सरकार अल्पमतात आलं आणि कमलनाथ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक झाली आणि शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आलं.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!
दरम्यान, काँग्रेसने मागील चार वर्षांत राज्य सरकारचा भ्रष्टाचार तसेच शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवरून सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधारे राज्याची सत्ता आपल्याला काबीज करता येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. दुसरीकडे, 'लाडली बहना'सारख्या जनतेला थेट लाभ देणाऱ्या योजना राबवत शिवराजसिंह चौहान यांनी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला होता.