Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील 'भोजशाला'नंतर आता विदिशातील 'बिजामंडल'बाबत नवा वाद सुरू झाला आहे. शुक्रवारी(दि.9) नागपंचमीच्या दिवशी हिंदू भाविकांनी येथे पूजा करण्याची परवानगी मागितली, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या(ASI) च्या एका पत्राचा हवाला देत पूजा करण्यास नकार दिला. बिजामंडल मंदीर नसून, मशीद असल्याचे एएसआयच्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपंचमीनिमीत्त हिंदू भाविकांनी बिजामंडल येथे पूजेसाठी जय्यत तयारी सुरू केली होती. पण, पूजेसाठी परवानगी मागणाऱ्या भाविकांना जिल्हाधिकारी बुद्धेश कुमार वैद्य यांनी नकार दिला. त्यांनी एएसआयच्या कागदपत्रांचा हवाला देत, बिजामंडल मशीद असल्याचे सांगितले. तसेच, नागपंचमीला होणाऱ्या पूजेबाबत पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा यंदाही पार पाडल्या जातील. पण, गेल्या वर्षी ज्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, तशीच सुरक्षा व्यवस्था शुक्रवारीही असेल, असेही ते म्हणाले.
70 वर्षांपासून मंदिराला कुलूप बिजामंडल हे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले वादग्रस्त ठिकाण आहे. या मंदिराचा आकार दिल्लीतील नवीन संसद भवनासारखाच आहे. पण, मागील 70 वर्षांपासून या मंदिराला कुलूप असून, हे आता एएसआयच्या ताब्यात आहे. 1951 च्या राजपत्रातील अधिसूचनेत बिजामंडलचे वर्णन मंदिर नसून मशीद असे करण्यात आले आहे. दुसरीकडे, हिंदू पक्षाचा दावा आहे की, हे 2500 वर्षे जुने सूर्य मंदिर आहे. ‘विजय मंदिर’ किंवा ‘बिजामंडल’ या नावाने ओळखले जाते. चालुक्य पंतप्रधान वाचस्पती यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा दावा केला जातो.
औरंगजेबाने मंदीर पाडून मशीद बांधली1024 साली महमूद गझनवीसोबत भारतात आलेला परदेशी प्रवासी अल्बेरुनी यानेही याचा उल्लेख केला आहे. हिंदू पक्षकारांनी असेही म्हटले आहे की, औरंगजेबाच्या आदेशानुसार 1682 मध्ये बिजामंडल तोफांनी नष्ट केले गेले होते. त्यानंतर येथे मशीद बांधण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदू महासभेने यासाठी सत्याग्रह केला. 1964 मध्ये येथे शेवटची नमाज अदा करण्यात आली होती. तेव्हापासून या मंदीरासाठी चळवळ सुरू आहे.
सरकारने नमाजावर बंदी घातलीतत्कालीन सरकारने येथे नमाजावर बंदी घालून याला सरकारी वारसा म्हणून घोषित केले होते. तसेच मुस्लिमांना नमाज अदा करण्यासाठी ईदगाहच्या नावावर स्वतंत्र जागा देण्यात आली. आजही या ठिकाणी मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. 1991 मध्ये अतिवृष्टीमुळे मंदिराची भिंत कोसळली होती, ज्यामध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर एएसआयने तीन वर्षे येथे उत्खनन केले. हिंदूचे म्हणणे आहे की, उत्खननादरम्यान मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले. ज्यामध्ये भगवान विष्णूची मूर्ती असलेल्या शिवलिंगाचा समावेश होता. तेव्हापासून हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र आहे.
नागपंचमीला पूजेची परवानगी मागितलीयेथे हिंदूंना नागपंचमीला पूजा करण्याची परवानगी आहे. पण, यंदा विजामंडलचे कुलूप उघडून आतमध्ये पूजा करण्याची परवानगी हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी एएसआयचा हवाला देत बिजामंडलचे कुलूप उघडण्यास नकार दिला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या कागदपत्रांमध्ये ही जागा मशिदीच्या नावाने नोंदलेली आहे. यावर हिंदू संघटनांनी आक्षेप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे पूजा करत असल्याचे हिंदू बाजूचे म्हणणे आहे. एएसआयच्या दाव्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.
हिंदू पक्षाचा दावा आहे की मुस्लिमांना कोणताही आक्षेप नाहीहिंदू बाजूने असेही म्हटले आहे की, मुस्लिमांनी कधीही याला मशीद असल्याचा दावा केला नाही. याबाबत खंत व्यक्त करत विजय मंदिर मुक्ती सेवा समितीच्या सदस्यांनी भाजपचे स्थानिक आमदार मुकेश टंडन यांच्या नेतृत्वाखाली विदिशा जिल्हाधिकारी आणि एसपी यांना लेखी निवेदन दिले. पत्रात त्यांनी एएसआयने मंदिर असे वर्णन करताना मशीद म्हणण्यावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पत्र पाठवून या जागेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. पत्रात राममंदिर, ज्ञानवापी आदी ठिकाणांची उदाहरणे देत पुन्हा सर्वेक्षण करून खरी परिस्थिती जाणून घेऊन मशीद हा शब्द हटवावा, असे म्हटले आहे.