मंत्रालय बदलल्याने भाजपाचा बडा नेता नाराज, दिली राजीनाम्याची धमकी, पत्नीही खासदारकी सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:28 PM2024-07-22T17:28:34+5:302024-07-22T17:28:50+5:30
Madhya Pradesh BJP News: मध्य प्रदेशमध्ये वर्षभरापूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक आणि अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपानं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. मात्र सध्या मध्य प्रदेश भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. मध्य प्रदेश सरकारमधील समाजकल्याणमंत्री नागर सिंह चौहान (Nagar Singh Chouhan) यांनी त्यांच्या पदावरून राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये वर्षभरापूर्वी झालेली विधानसभेची निवडणूक आणि अलिकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपानं निर्विवाद वर्चस्व राखलं होतं. मात्र सध्या मध्य प्रदेशभाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. मध्य प्रदेश सरकारमधील समाजकल्याणमंत्री नागर सिंह चौहान यांनी त्यांच्या पदावरून राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांची पत्नीही खासदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. नागर सिंह चौहान यांच्याकडे असलेलं वन आणि पर्यावरण मंत्रालयाचं खातं काढून घेऊन काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या रामनिवास रावत यांना दिल्याने चौहान हे नाराज झाले आहेत.
मंत्री नागर सिंह रावत यांनी सांगितले की, जर भाजपा संघटनेतील नेत्यांनी मी व्यक्त केलेल्या चिंतेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही तर माझी पत्नी अनिता सिंह चौहानसुद्धा खासदारकीचा राजीनामा देईल. ते पुढे म्हणाले की, माझं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही. मी आधी संघटनेच्या पातळीवर चर्चा करेन. त्यानंतर पुढील पाऊल टाकेन. आता पदावर राहायचं नाही असं मला वाटलं तर मी पत्नी अनिता यांच्यासोबत राजीनामा देईन, असा इशारा त्यांनी दिला.
मध्य प्रदेशमध्ये २३ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. मात्र आता आदिवासींशी संबंधित असलेला वन विभाग माझ्याकडून काढून काँग्रेसमधून आलेल्या एका नेत्याला दिला गेला आहे. हा निर्ण माझ्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्त्यांसाठी फायदेशीर आहे, असं मला वाटत नाही, अशी टीकाही नागर सिंह चौहान यांनी केली.