मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. आज मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली. आता केवळ उज्ज्वला योजनेतील लोकांनाच नाही तर उज्ज्वला योजनेत नसलेल्या लोकांनाही कायमस्वरूपी ४५० रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी बडवाह विधानसभा मतदारसंघात पोहचली. यावेळी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रोड शो करत जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर चाललेल्या रोड शोनंतर मुख्यमंत्र्यांचा रथ कृषी उत्पन्न बाजार संकुलात पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी सर्वसामान्यांना दिली. तसेच १० तारखेचा दिवस बहिणींच्या आयुष्यात बदल घडवणारा आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक शाळेतील ३ मुलांना मिळणार स्कूटी मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिलेल्या लोकांना लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच आता ६० टक्के गुण मिळविणाऱ्या मुला-मुलींना देखील लॅपटॉप दिले जातील. प्रत्येक शाळेतील तीन मुलांना स्कूटीही दिली जाणार आहे.
निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस "आमच्या मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शिकायचे आहे, आम्ही त्यांना कंपनीत काम शिकवू आणि दरमहा ८ हजार रूपये स्टायपेंडही दिला जाईल. तुम्ही सर्व जण कुटुंबासारखे आहात. तुमच्या समस्या दूर करून तुमच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारइतके रस्ते काँग्रेसने कधी बांधले होते का? कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक केली. पण, भाजपा सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे २२०० कोटी रुपयांचे व्याज भरले", असेही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.