मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना सरप्राईज; DA वाढल्यानं होणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:31 PM2023-06-26T13:31:14+5:302023-06-26T13:32:12+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीपूर्वी राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशातील जवळपास साडेसात लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली असून यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना ३८ टक्के डीए मिळत होता, जो मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेअंतर्गत भैरुंदा येथे आयोजित सामूहिक कन्या विवाह परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील चार टक्के डीएमधील अंतर दूर होणार असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. तसेच अंगणवाडी सेविका व सहाय्यकांच्या मानधनात यापूर्वीच वाढ करण्यात आली असून त्यांना दरवर्षी वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
कधीपासून मिळणार फायदा?
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर वित्त विभाग सक्रिय झाला असून एक-दोन दिवसांत त्यासंबंधीचे आदेशही निघणार आहेत. हा वाढीव डीए जुलैमध्ये मिळालेल्या पगारात दिला जाणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांना किमान ८०० रुपये आणि अधिकाऱ्यांना ६००० रुपयांचा फायदा होईल. पण यामुळे सरकारी तिजोरीवर दरमहा जवळपास १५० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.