नवी दिल्ली : मध्य प्रदेशचेमुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीला फार कालावधी उरला नसून राज्यातील सत्तेची कमान राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे भाजपाने जनतेपर्यंत पोहचण्यासाठी सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा. ही यात्रा आता मुरैना येथे पोहोचली असून इथे जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी भरपावसात भाषण केले.
पावसात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझी माणसं भिजत असतील तर मी देखील भिजत सभा घेईन. मग पावसात भिजत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान अनेक महिला मंचाजवळ आल्या आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. तसेच जौरा नगर पंचायतीचे नगरपालिकेत रुपांतर करण्याची घोषणा करून जौरावासीयांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.
भरपावसात घोषणांचा पाऊसयावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, आमच्या मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम शिकायचे आहे, आम्ही त्यांना कंपनीत काम शिकवू आणि दरमहा ८ हजार रूपये स्टायपेंडही दिला जाईल. तुम्ही सर्व जण कुटुंबासारखे आहात. तुमच्या समस्या दूर करून तुमच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारइतके रस्ते काँग्रेसने कधी बांधले होते का? कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूक केली. पण, भाजपा सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे २२०० कोटी रुपयांचे व्याज भरले.
दरम्यान, शेतकर्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा होतील, जे प्रत्येकी २ हजार रुपयांच्या हप्त्याने जमा केले जात आहेत. माता-भगिनींना पूर्वी १००० रुपये दिले जात होते, आता मी ते १२००, १५००, १७५० आणि २२०० रुपयांवरून ३००० रुपये करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.