Madhya Pradesh CM Mohan Yadav News ( Marathi News ): आमच्यासाठी भाजपाचे संकल्पपत्र हे भगवद्गीता आणि रामायणाच्या पवित्र ग्रंथासारखे आहे. हे संकल्पपत्र आमच्या सरकारचा पुढील पाच वर्षांचा अजेंडा ठरवेल. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी काम करणे हे राज्य सरकारचे काम आहे. त्यासोबतच राज्याचा व देशाचा लौकिक वाढविण्यावरही भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले आहे. विधानसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
भाजपाने एका चहा विक्रेत्याला पंतप्रधान आणि मजूर कुटुंबातील मुलाला मुख्यमंत्री केले. हे फक्त भाजपाच करू शकते. काँग्रेसमध्ये अशा गोष्टींचा अभाव आहे. हे लोक लंडनला जाऊन कपडे खरेदी करतात, त्यांना काय समजणार? असा खोचक सवाल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलावे, अशी मागणी विरोधकांनी केली.
भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल
भाजपमध्ये पुढच्या पिढीची काळजी घेतली जाते. पण काँग्रेस पक्षाला यासाठी मोठा धक्का बसावा लागतो. काँग्रेसचा अहवाल खराब आहे. अरुण यादव यांनी खूप काम केले, पण काँग्रेस पक्षाने कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांना पुढे केले. भविष्यात तरी काँग्रेस पक्ष आमच्याकडून काही शिकेल, असा टोला मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लगावला.
आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, भाजपाचे संकल्पपत्र हे पवित्र ग्रंथासारखे आहे. आमच्यासाठी ते गीता आणि रामायणासारखे आहे. हे एका महिन्याचे सरकार किंवा १३ महिन्यांचे सरकार नाही, ते पाच वर्षांचे आहे. आम्ही तुमच्याशी पाच वर्षांनी संकल्पपत्राबाबत बोलू. आमचे सरकार आल्यापासून आम्ही अनेक अजेंडे पुढे नेत आहोत. आम्ही आमचा अजेंडा जनतेमध्ये घेऊन जातो आणि जनता त्याला मान्यता देते, असे मोहन यादव यांनी नमूद केले.
दरम्यान, काही लोक दिवसाची सुरुवात सूर्योदयाने करतात तर काही सूर्यास्तानंतर. पण, रात्री बारा वाजल्यापासून दिवस बदलण्याची ही कसली सुरुवात, असे मुख्यमंत्री यादव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री यादव यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, हे खूप चांगले आहे, आजपासून राज्याचा वेळ का बदलत नाही, असा खोचक सवाल काँग्रेस नेते जयवर्धन सिंह यांनी केला.