"म्हणून मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुललं..."; मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सांगितले यशाचे गमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 01:36 PM2023-12-03T13:36:26+5:302023-12-03T13:36:54+5:30
मध्य प्रदेशात भाजपा मॅजिक फिगर गाठणार हे जवळपास निश्चित
Madhya Pradesh Assembly Election Result 2023, CM Shivraj Singh Chauhan: मध्य प्रदेशासह एकूण चार राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. निकालाचे सुरूवातीचे कल हाती येऊ लागले असून त्यात भाजपाने चार पैकी तीन राज्यांत मुसंडी मारल्याचे चित्र आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपा काही अंशी पुढे असल्याचे दिसत आहे. राजस्थानात परंपरेप्रमाणे दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असल्याने तेथे अपेक्षेप्रमाणे भाजपाची सत्ता येणार असल्याचे चित्र आहेत. तर मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुन्हा एकदा बहुमताचा आकडा गाठत सत्तेत कायम राहणार असल्याचे दिसत आहे. सकाळी १२ वाजेपर्यंतच्या निकाल आणि कलांचा अंदाज घेता, भाजपाच्या १५० पार तर काँग्रेस ७५ च्या आसपास आहे. यानंतर भाजपाला विजयाचा विश्वास असल्याने शिवराज सिंग चौहान यांनी प्रसन्न मुद्रेने पत्रकारांशी संवाद साधला.
"मोदीजी एमपी के मन में है और मोदीजी के मन में एमपी है. पंतप्रधान मोदी यांनी राज्यात सार्वजनिक सभा आणि रॅली घेतल्या, जनतेला साद घातली आणि ते लोकांच्या मनाला भिडले. आता दिसत असलेले निकालाचे कल हे त्याच रॅलींचे फलित आहे. मध्य प्रदेशातील आमच्या सरकारने केंद्र सरकारच्या योजना योग्य प्रकारे राबवल्या. तसेच राज्य सरकारने केलेल्या योजनादेखील जनतेला फायद्याच्या ठरल्या. मध्य प्रदेश आमच्यासाठी एक कुटुंब बनलं आहे. मी आधीच सांगितलं होतं की भाजपा विजयी होणार. मी लोकांच्या डोळ्यात भाजपाबद्दल असलेलं प्रेम पाहिलं आहे. त्यामुळे मला हा विश्वास होता," अशी प्रतिक्रिया चौहान यांनी दिली.
#WATCH | #MadhyaPradeshElections2023 | Incumbent CM Shivraj Singh Chouhan says, "Modi ji MP ke mann mein hain aur Modi ji ke mann mein MP hai. He held public rallies here and appealed to the people and that touched people's hearts. These trends are a result of that. Double-engine… pic.twitter.com/MHOUthgsRr
— ANI (@ANI) December 3, 2023
"काँटे की टक्कर होईल असे विरोधक म्हणत होते. पण 'लाडली बहना' योजनेने रस्त्यातील सारे काटे काढून टाकले आणि आम्हाला विजयी केले," असेही ते म्हणाले.
दरम्यान, मध्य प्रदेशात एकूण २३० जागांसाठी मतदान पार पडले. मतमोजणीचे कल हाती येताच भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे दिसत आहे. याशिवाय भाजपाचे काही बडे नेतेमंडळी देखील आघाडीवर आहेत. २३० जागांपैकी १५० पेक्षा जास्त जागांवर भाजपा आघाडीवर असल्याचे चित्र १ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार दिसत होते. त्यामुळे सलग पाच वेळा भाजपाचे सरकार सत्तेत येणार हे चित्र जवळपास स्पष्ट आहे.