“लोकशाही सेनानी सन्मान निधी आता दरमहा ३० हजार मिळणार”; शिवराज सिंह चौहान यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:59 PM2023-06-27T12:59:25+5:302023-06-27T13:01:29+5:30
ते लोकशाही सेनानींच्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते.
भोपाळ: आणीबाणीच्या काळात लोकशाही सैनिकांनी भारत मात की जय अशा घोषणा दिल्या होत्या. सत्तेत राहण्यासाठी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला. मात्र लोकशाहीसाठी लढणाऱ्यांनी परिणामांची तमा न बाळगता अनेक यातना सहन केल्या. देशाच्या स्वातंत्र्याचे तिसरे युद्ध ते लढले. या संघर्षाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आणि धर्म आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते लोकशाही सेनानींच्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते.
लोकशाही सेनानींना देण्यात येणारा २५ हजार रुपयांचा सन्मान निधी आता दरमहा ३० हजार रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. तसेच ज्या लोकशाही सेनानींना एक महिन्यापेक्षा कमी काळ तुरुंगवास भोगावा लागला आहे, त्यांचा सन्मान निधी ८ हजार रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांना दिला जाणारा निधीही ५ हजार रुपयांवरून ८ हजार रुपये करण्यात येणार आहे. लोकशाही सेनानींना दिल्लीतील वास्तव्यादरम्यान मध्य प्रदेश भवनात राहण्याची सोय असेल. ५० टक्के शुल्क भरून जिल्हा विश्रामगृहात राहता येणार आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या आजारांवर राज्य सरकारकडून संपूर्ण उपचार केले जाणार आहेत. शासकीय कार्यालयात सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी विशेष सूचना जारी करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
लोकशाही सेनानींना राज्य सरकारकडून ताम्रपट
शिवराज सिंह चौहान पुढे म्हणाले की, लोकशाही सेनानींना राज्य सरकारकडून ताम्रपट देण्यात आले, ज्यांना अद्याप ताम्रपट मिळणे बाकी आहे, त्यांनाही तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील. लोकशाही सैनिकांनी कोणत्याही संकटात स्वतःला एकटे समजू नये, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही शिवराज सिंह चौहान यांनी दिली. तसेच आणीबाणीच्या काळात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. एक तत्व, विचारसरणी आणि संघटनेसाठी लोकशाही सैनिकांनी यातना सहन केल्या. आज जगभर या विचारसरणीचा डंका वाजत आहे. पंतप्रधान मोदींनी भारताचा अभिमान वाढवला आहे. सध्या लोकशाही वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, ज्यांचा भारतीय संस्कृती, मूल्ये आणि परंपरांशी काहीही संबंध नाही अशांनी सावध राहणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या भाषणात बाबा नागार्जुन आणि आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांच्या ओळींचाही उल्लेख केला.
राष्ट्राला अधिक बळकट बनवण्याचा आमचा संकल्प
सामान्य प्रशासनाचे मंत्री इंदर सिंह परमार यावेळी बोलताना म्हणाले की, आणीबाणीच्या काळात लोकशाही सेनानींच्या लढ्याने बदल घडवून आणला गेला. मिसा कैद्यांच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री चौहान यांनी पुढाकार घेतला. तर, माजी केंद्रीय मंत्री विक्रम वर्मा म्हणाले की, आणीबाणीच्या काळात लोकशाही सेनानी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य खचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. कुटुंबियांनी हा त्रास सहन केला. राष्ट्राला अधिक बळकट बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि आजही आम्ही त्या दिशेने काम करत आहोत, असे ते म्हणाले.
लोकशाही सेनानी हा देशाचा वारसा
माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जातिया म्हणाले की, आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा डाव उधळून लावण्यासाठी सुमारे दीड लाख लोकांनी आंदोलन केले आणि त्यांना अटक करण्यात आली. तो सत्तेशी सत्याचा संघर्ष होता. लोकशाहीला अर्थपूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी परिश्रम घेतले. राज्यसभा सदस्य कैलास सोनी म्हणाले की, लोकशाही सेनानी हा देशाचा वारसा आहे. ज्यांनी देश आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी काम केले. मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तपन भौमिक उपस्थित होते. ज्येष्ठ वकील भरत चतुर्वेदी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुरेंद्र द्विवेदी यांनी केले.
दरम्यान, निवासस्थानी आयोजित परिषदेचे मुख्यमंत्री चौहान यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. वंदे-मातरमचे गायन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकशाही सेनानींचे स्वागत केले आणि त्यांना मानचिन्ह दिले. आणीबाणीच्या कटू आठवणींवर आधारित रमेश गुप्ता यांच्या "मैं मीसाबंदी आपतकाल व्यथा-कथा-19 महिने" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.