२७ जूनला PM मोदी भोपाळ दौऱ्यावर! CM शिवराज सिंह चौहान यांनी घेतला तयारीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 01:53 PM2023-06-26T13:53:19+5:302023-06-26T13:54:22+5:30
PM Modi Madhya Pradesh Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय मध्य प्रदेश दौऱ्यावर असून, या भेटीच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला.
भोपाळ: अमेरिका, इजिप्त दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशात परतले आहेत. यानंतर आता २७ जून रोजी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. या एकदिवसीय दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी भोपाळ आणि शहडोल येथील कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशमधील आणखी दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शहडोल येथे पोहोचले. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. त्याआधी भोपाळ येथे जाऊन शिवराज सिंह चौहान यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदींच्या रोड-शो मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. रोड शो दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना शिवराज सिंह चौहान यांनी दिल्या.
मध्य प्रदेशला मिळणार आणखी दोन वंदे भारत एक्स्प्रेस
रानी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी तेथे होत असलेल्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या कार्यक्रमावेळी अन्य रेल्वे प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, अशा सूचना शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भोपाळमधील रानी कमलापती रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान मोदी २७ जून रोजी भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी पंतप्रधान मोदी नागरिकांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदी ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी, ‘मध्य प्रदेश के मन में मोदी’ या थीमवर भव्य रोड शो होणार आहे.
दरम्यान, भोपाळ येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी शहडोलला पोहोचतील. येथे वीरांगना रानी दुर्गावती बलिदान दिन गौरव यात्रेच्या भव्य समारोप समारंभास उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पंतप्रधान मध्य प्रदेशात एक कोटीहून अधिक आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे उद्घाटन करतील. यानंतर प्रत्येक गावात कार्यक्रम घेऊन कार्ड वाटप केले जाणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी सिकलसेल अॅनिमिया मिशनचा शुभारंभ करतील. यानंतर शहडोलच्या पकारिया गावात जाऊन पंतप्रधान मोदी ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.