CM शिवराज सिंह चौहान यांची स्पष्टोक्ती, 'दीनदयाल रसोई' योजनेचे नाव बदलले जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 08:47 PM2023-06-28T20:47:43+5:302023-06-28T20:48:38+5:30
'दीनदयाल रसोई' अंतर्गत मध्य प्रदेशातील गरीब नागरिकांना पाच रुपयांत जेवण दिले जाते.
भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी 'दीनदयाल रसोई'(Deendayal Rasoi) बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या दीनदयाल रासोईच्या नावात कोणताही बदल होणार नाही, अशी स्पक्टोक्ती त्यांनी दिली. कॅबिनेटमध्ये दीनदयाल रसोईला 'मामा की थाली' नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
सीएम शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, 'ही योजना दीनदयाल रसोई याच नावाने सुरू राहील, नावात कोणताही बदल केला जाणार नाही. नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण तो प्रस्ताव मान्य केला नाही.'
दीनदयाल रसोई, दीनदयाल रसोई ही रहेगी। इसके नाम में कोई भी परिवर्तन नहीं होगा। इस संबंध में मंत्री परिषद का प्रस्ताव था, लेकिन परिवर्तन का कोई प्रश्न ही नहीं है: CM pic.twitter.com/SYA8AIkE20
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) June 28, 2023
बैठकीत सर्व मंत्र्यांचे नाव बदलण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देत या योजनेचा विस्तार पालिका स्तरापर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, ही थाली दहाऐवजी पाच रुपयांत मिळणार असून, दीनदयाल रसोईसोबतच मामा की थाली हे नावही जोडले जाईल, असे ते म्हणाले होते. पण, काही वेळातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, या योजनेचे नाव दीनदयाल रसोई राहील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
काय आहे दीनदयाल रसोई?
राज्यातील शहरी भागात व्यवसाय आणि मजुरीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीबांना 'दीनदयाळ अंत्योदय भोजन योजना' सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत अतिशय स्वस्तात जेवन दिले जाते. ही योजना सर्व जिल्हा मुख्यालयांसह मैहर, अमरकंटक, महेश्वर, ओंकारेश्वर, चित्रकूट अशा 6 धार्मिक शहरांमध्ये कार्यरत आहे.