भोपाळ: 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याचे विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. मध्य प्रदेशात भाजपला आपली सत्ता राखण्यात यश आले. दरम्यान, 7 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभेत एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. रतलामच्या सैलानाचे आमदार कमलेश्वर दोडियार चक्क बाईकवरून विधानसभेत पोहोचले. विशेष म्हणजे, रतलामपासून सुमारे 300 किमी बाईक चालवत ते भोपाळला आले.
आमदार कमलेश्वर दोडियार अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्याकडे स्वतःचे चारचाकी वाहनदेखील नाही. सैलाना विधानसभेतून कमलेश्वर पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. आजही त्यांचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. कमलेश्वर स्वतः झोपडीत राहतात. ते स्वतःही मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवायचे. आता आमदार झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काम करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
कमलेश्वर यांनी दिल्लीतून कायद्याचे शिक्षण घेतले. भारतीय आदिवासी पक्षाकडून मध्य प्रदेश विधानसभेत विजयी झालेले पहिले नेते आहेत. कमलेश्वर यांनी विधानसभा निवडणुकीत 4618 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 71219 मते मिळाली, तर काँग्रेसचे हर्ष विजय गेहलोत यांना 66601 मते मिळाली. याच सैलाना विधानसभा जागेवर सर्वाधिक 90 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. कमलेश्वर नेहमीच आपल्या भागातील मूलभूत सुविधांसाठी लढायचे, हाच लढा पाहून मतदारांनी त्यांना विजयी केले.
अशा गरिबीत घालवलेले आयुष्यकमलेश्वर अत्यंत गरीब कुटुंबातून आले आहेत. आजही ते झोपडीत राहतात. कमलेश्वर त्यांच्या 9 भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. काबाडकष्ट करून त्यांचे कुटुंब जगले. आजही त्यांचे संपूर्ण कुटुंब काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करत आहे. कमलेश्वर यांची ही तिसरी निवडणूक आहे. 2013 मध्ये त्यांनी विधानसभा आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूकही लढवली आहे. त्यांना आता तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले.