भोपाळ : या वर्षअखेर मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदीमध्य प्रदेशाकडे विशेष लक्ष देत आहेत. दरम्यान, या वर्षी मध्य प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचीही नवी दिशा ठरवणार असल्याचे दिसून येते.
अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ दिवसांत दोनदा मध्य प्रदेश दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पुनरागमनाच्या तयारीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी दर महिन्याला मध्य प्रदेशात सभा घेत आहेत. १४ सप्टेंबर रोजी ते बीना रिफायनरी येथे पेट्रोकेमिकल प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्यानंतर १० दिवसांनंतर ते पुन्हा २५ सप्टेंबरला भोपाळला येतील आणि कार्यकर्ता महाकुंभाला संबोधित करतील.
या कार्यक्रमात भाजपच्या पाच जनआशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. या कार्यकर्ता महाकुंभासाठी भाजपने १० लाख कार्यकर्ते एकत्र करण्याची तयारी केली आहे. ऑगस्टमध्येच नरेंद्र मोदी सागर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. येथील बडतुमा गावात नरेंद्र मोदींनी संत रविदास मंदिर आणि संग्रहालयाची पायाभरणी केली होती. याआधी ते जूनमध्ये भोपाळला आले होते आणि मेरा बूथच्या जोरदार कार्यक्रमात सहभागी झाले होते.
तसेच, जुलैमध्येही नरेंद्र मोदींनी शहडोलमध्ये आदिवासी समाजाशी संवाद साधला होता. आता पुन्हा नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये (१४ आणि २५ सप्टेंबर) दोनदा मध्य प्रदेशात येणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी ओंकारेश्वर येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचाही प्रस्ताव आहे, मात्र संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.