मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने घरात झोपलेल्या तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने विरोध करताच त्याने तिला विष पाजले. या घटनेबाबत समजताच तरुणीच्या घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले. पंरतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीने मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबवरून, संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूर येते शनिवारी रात्री आरोपीने घरात झोपलेल्या एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध करताच आरोपीने तिला विष पाजले आणि तिचा मोबाईल घेऊन फरार झाला. तरुणीला उलट्या झाल्यानंतर तिच्या कुटुंबाला हा सर्व प्रकार समजला. त्यांनी ताबडतोब तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. तरुणीची प्रकृती आणखी बिघडल्यानंतर तिला जबलपूर येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणीच्या मृत्यूअगोदर तिचा जबाब नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर जिल्ह्यातील मझोली ठाण्याच्या हद्दीत ग्राम कुंभवारा येथे राहणारा आरोपी मोनू पटेल आणि मृत तरुणी गेल्या वर्षाभरापासून फोनवर बोलायचे. आरोपीने शिवीगाळ केल्यानंतर तरुणीने मोनूशी बोलणे बंद केले. मोनूने अनेकदा तिच्यावर बोलण्यासाठी दबाव टाकला. परंतु, तरुणीने स्पष्ट नकार दिला. मात्र, यामुळे नाराज झालेला मोनू शनिवारी रात्री तरुणीच्या घरात घुसला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध करताच त्याने तिला विष पाजले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.