मध्य प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील १७ धार्मिक शहरांत दारुबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या १ एप्रिलपासून ही दारुबंदी लागू केली जाणार आहे.
या शहरांतील सर्व दारु विक्रीची दुकाने बंद केली जाणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. संपूर्ण राज्यात ही दारुबंदी नसून या शहरांच्या हद्दीतच ही दारुबंदी केली जाणार आहे. बंद होणारी दुकाने इतरत्रही हलविली जाणार नाहीत. ती पूर्णपणे बंद केली जाणार आहेत, असे यादव म्हणाले.
मध्य प्रदेशातील शहरांचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर नर्मदा नदीच्या दोन्ही काठांवरही पाच किमी पर्यंत दारुची दुकाने, बार नसणार आहेत. महाकाल ज्योतिर्लिंगामुळे उज्जैन दारूमुक्त करण्यात येत आहे. विविध नगरपालिका आणि नगरपरिषदा देखील पूर्णपणे दारूमुक्त करण्यात आल्या आहेत. बहुतांश या ग्राम पंचायती आहेत. परंतू, त्यांना आता नगरांचे रुप आले आहे. यामध्ये मांडला- नगरपालिका, मुलताई नगरपालिका, सालकनपूर ग्रामपंचायत, बर्मनकलान, लिंगा, बर्मनखुर्द ग्रामपंचायत, कुंडलपूर ग्रामपंचायत, बंदकपूर ग्रामपंचायत, ओंकारेश्वर नगर पंचायत, महेश्वर नगर पंचायत, मंडलेश्वर नगर पंचायत, ओरछा नगर पंचायत, चित्रकूट नगरपालिका परिषद समाविष्ट आहे. बर्मनकलान, लिंगा आणि बर्मनखुर्दू ही तिन्ही गावे एकाच ग्रामपंचायतीअंतर्गत येतात.
अमरकंटक हे नर्मदेचे उगमस्थान आहे. यामुळे येथे दारू बंदी असेल. मंदसौरमध्ये पशुपतिनाथाचे मंदिर आहे. येथील लोकही बऱ्याच काळापासून दारूबंदीची मागणी करत होते.