मध्य प्रदेश सरकारची ‘लर्न अँड अर्न’ योजना, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज करणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:46 PM2023-07-04T14:46:10+5:302023-07-04T14:47:38+5:30
Madhya Pradesh: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील तरुणांचं हित आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक विकासामध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्याच दिशेने एक पाऊल टाकताना शिवराज सिंह चौहान यांनी अर्न अँड लर्न (शिका आणि कमवा) ही योजना सुरू केली आहे.
यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारकडून अनेक योजनांची सुरुवात होत आहे. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील तरुणांचं हित आणि राज्याच्या सामाजिक, आर्थिक विकासामध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. त्याच दिशेने एक पाऊल टाकताना शिवराज सिंह चौहान यांनी अर्न अँड लर्न (शिका आणि कमवा) ही योजना सुरू केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज या योजनेची औपचारिक सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमावेळी शिवराज सिंह चौहान हे विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.
मुख्यमंत्री शिका आणि कमवा योजनेमधून प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना उद्योगाभिमुख नवं तंत्रज्ञान आणि प्रकियांमध्ये दक्षता आणण्यासाठी प्रशिक्षित केलं जाईल. त्यामुळे त्यांना सजगपणे रोजगा मिळू शकेल. या योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षित केलं जाईल.
मध्य प्रदेश सरकारने यावर्षी आपलं युवा धोरण जाहीर केलं होतं. जिथे एक युवा पोर्टलसुद्धा सुरू केलं आहे. यामध्ये समग्र विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. शिका आणि कमवा योजनासुद्धा एकप्रकारे सरकारच्या नव्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आवश्यकतेनुसार हे लक्ष्य वाढवण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत लागू करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमाची यादी ही www.mmsky.mp.gov.in या योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. या पोर्टलवर नोंदणी २६ जूनपासून सुरू झाली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २९ ही वयोमर्यादा आहे. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक योग्यतेनुसार ८ हजार, ८ हजार ५००, ९ हजार आणि कमाल १० हजार रुपये एवढं दरमहा स्टायपेंड मिळणार आहे.