लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये भाजपाने आपल्या आमदारांकडून अहवाल मागवला आहे. ज्या मतदारसंघात कमी मतदान झालं आहे, त्याचं कारणही तेथील आमदारांना विचारण्यात आलं आहे. आमदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पक्षनेतृत्व या अहवालाचा अभ्यास करणार आहे. २५ मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर किंवा ३० मे नंतर कधीही भाजपाच्या नेत्यांची बैठक बोलावली जाऊ शकते. या बैठकीसाठी मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी डॉ. महेंद्र सिंह, सहप्रभारी सतीश उपाध्याय हेसुद्धा मध्य प्रदेशमध्ये येणार आहेत.
प्रभारी, सहप्रभारी यांच्यासह मध्य प्रदेश भाजपाचे दिग्गज नेते या अहवालाचं अध्ययन करतील. मात्र ३० मे पर्यंत मुख्यमंत्री मोहन यादव आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा निवडणूक प्रचारासाठी इतर राज्यांमध्ये असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भाजपाच्या अर्ध्या आमदारांनी अहवाल सादर केला आहे. जे निवडणूक प्रचारासाठी गेलेले आहेत, त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे. आमदारांकडून मिळणारा अहवाल आणि पक्षाने तयार केलेला अहवाल यांची पडताळणी केली जाईल. तसेच त्या आधारावर आमदारांचं आकलन होईल, तसेच त्यामधून त्यांचं राजकीय भविष्य निर्धारित केलं जाईल.
भाजपाने आमदारांकडून माहिती मागवलेले आठ प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत१) आमदारांच्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कशी होती?२)मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीची स्थिती कशी होती.३) कुठल्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ३७० मतं अधिक पडली. ४)जिथे कमी मतदान झालंय, त्याचा पक्षाच्या सकारात्मक निकालावर किती परिणाम होईल?५)मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं मूळ कारण काय आहे? ६) आमदारांनी मतदान वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले?७) पक्षाच्या कुठल्या नेत्याने खूप मेहनत घेतली आणि कुणी केवळ औपचारिकता पूर्ण केली.८) प्रचारादरम्यान आमदार ग्रामीण भागात किती रात्री वास्तव्याला राहिले?
दरम्यान, भाजपाने आमदारांकडे मागवलेल्या या अहवालावर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपाला फिडबॅक घेण्याची काय गरज आहे. निवडणूक आयोगापासू सगळी व्यवस्था त्यांचीच आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या संगीता शर्मा म्हणाल्या की, अजून काही उरलं तर ईव्हीएम सेट केली जाते. मात्र एवढं सारं करूनही भाजपा फिडबॅक घेत असेल तर त्यांना वास्तव समजलं आहे, आपला पराभव होणार हे त्यांना कळून चुकलंय. त्यांनी जे लक्ष्य समोर ठेवलं होतं, त्यापेक्षा ते खूप मागे राहिले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे