मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये रेफ्रिजरेटरचा स्फोट होऊन घर कोसळल्याची घटना घडली आहे. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील लोक लगेच बाहेर पळाले, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटानंतर घराला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याचे घरमालकाचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेफ्रिजरेटरचे कॉम्प्रेसर ब्लास्ट झाले आहे.
मुरैना येथील नगर सेन रोड मंदिर परिसरात राहणारे टिंकू माहोरे यांनी सोमवारी त्यांच्या घरी केल्विनेटर कंपनीचा नवीन फ्रीज आणला होता. नवीन फ्रीज घरात आल्यामुळे सगळेजण खुश होते. मंगळवारी सायंकाळी रेफ्रिजरेटर चालू केल्यानंतर घरातील सर्व सदस्य बाहेरच्या खोलीत बसले. यावेळी अचानक फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला.
कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने घराचे छत आणि मागील भाग कोसळला. खोलीत ठेवलेले इलेक्ट्रॉनिक्स सामान आणि कपड्यांसह घरातील इतर साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले होते.