मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:57 PM2023-12-11T13:57:05+5:302023-12-11T14:03:13+5:30

बैठकीसाठी भाजप कार्यालयातही विशेष तयारी करण्यात आली असून चार वाजेपर्यंत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

madhya pradesh new cm bjp legislative party meeting in bhopal | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? आज संध्याकाळी होणार निर्णय, भोपाळमध्ये आमदारांची बैठक!

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर झाले. यानंतर जवळपास एक आठवडा होऊन सुद्धा अद्याप मुख्यमंत्र्यांचा निर्णय झालेला नाही. आज भोपाळ येथील भाजप कार्यालयात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. बैठकीसाठी कार्यालयातही विशेष तयारी करण्यात आली असून चार वाजेपर्यंत बैठक पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी तिन्ही निरीक्षक भोपाळला पोहोचले आहेत. मनोहर लाल खट्टर, डॉ के लक्ष्मण आणि आशा लाकडा हे मध्य प्रदेशचे निरीक्षक आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तिन्ही निरीक्षकांचे स्वागत केले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ शकते. दरम्यान, मध्य प्रदेशातील सर्वात जास्त लोकसंख्या ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय आहे. यामुळे गेल्या २० वर्षात भाजपने मागासवर्गीयांमधून तीन मुख्यमंत्री दिले आहेत. अशा परिस्थितीत प्रल्हाद पटेल आणि ज्योतिरादित्य शिंदे मागासवर्गीयांमधून येतात.

दरम्यान, यंदाच्या संपूर्ण निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचे नेते राहुल गांधी ओबीसींवर आपले सर्वोत्तम राजकारण आजमावत होते. जात जनगणनेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. पण राज्याच्या निवडणुकीत त्याचा काही उपयोग झाला नाही. निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत भाजप यावेळी ओबीसींशिवाय दुसरा चेहरा मुख्यमंत्री म्हणून समोर आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे "एमपीच्या मनात मोदी, पण मोदींच्या मनात कोण?" हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आमदारांना मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य करण्यास मनाई
दरम्यान, आमदारांना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या निमंत्रण पत्रात ही सूचना विशेषतः देण्यात आली आहे. बैठकीपूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे टाळा, असे सांगण्यात आले आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत नोंदणी व जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. दुपारी साडेतीन वाजता विधिमंडळ पक्षाचा ग्रुप फोटो काढला जाणार आहे. दुपारी ३.५० वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. तसेच, बंदूकधारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर ठेवण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: madhya pradesh new cm bjp legislative party meeting in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.