Madhya Pradesh: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यक्रमातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुशवाह समाजाच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिवराज सिंह चौहान रविवारी सागरमध्ये पोहोचले होते. यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या चिमुकल्या मुलाला स्टेजच्या दिशेने फेकले. मूल काही अंतरावर पडले, यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. मात्र, तत्काळ घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रडणाऱ्या बाळाला उचलून त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
आईने सुरक्षा रक्षकाच्या हातातून मुलाला घेऊन घट्ट मिठी मारली. हे पाहून व्यासपीठावर उभ्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना त्या महिलेची व्यथा ऐकून घेण्याच्या सूचना दिल्या. मुलाच्या हृदयात छिद्र असून ऑपरेशनसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. यावेळी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिवराज यांनी पीडित मुलाच्या पालकांना दिले. चौहान यांनी शेजारीच बसलेल्या जिल्हाधिकारी दीपक आर्य यांना तक्रारदाराची केस सीएम हाऊसकडे पाठवण्याची सूचना केली.
बाळाला का फेकले?व्यवसायाने मजूर असलेले मुकेश पटेल हे सागरच्या केसली तहसीलच्या सहजपूर गावचे रहिवासी आहेत. ते पत्नी नेहा पटेल आणि बालकासह मुख्यमंत्र्यांकडे मदतीसाठी गेले होते. मुकेश यांना सीएम शिवराज यांच्याकडे जाऊ दिले नाही, त्यामुळे त्यांनी मुलाला स्टेजसमोरील बॅरिकेड्सच्या आत फेकले. त्यावेळी सीएम शिवराजही मंचावर होते. हे दृश्य पाहताच त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना या जोडप्याचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले.