केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन कायद्याविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी संप पुकारला होता. त्याचा परिणाम देशातील बहुतांश मालाच्या दळणवळणावर झाला होता. दरम्यान, मध्य प्रदेशमधील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची लायची काढल्याने प्रकरण चिघळले होते. दरम्यान, या जिल्ह्याधिकाऱ्यांवर आता मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
शाजापूर येथे घडलेल्या या घटनेबाबत कारवाई करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांन संबंधित जिल्ह्याधिकारी किशोर कन्याल यांना पदावरून हटवले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं की, हे सरकार गरिबांचं आहे. सर्वांच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गरिबांची सेवा करत आहोत. मानवतेच्या भावनेतून अशी भाषा आमचं सरकार सहन करणार नाही. मी स्वत: मजूर कुटुंबातील मुलगा आहे. अशी भाषा वापरणं योग्न नाही. अधिकाऱ्यांना भाषा आणि व्यवहारावर लक्ष ठेवावं.
काल झालेल्या बैठकीवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच, नीट समजावून सांगा, असेही तो म्हणाला. त्यावर, जिल्हाधिकाऱ्यांना राग अनावर झाला. त्यांनी ड्रायव्हरला सुनावले. यामध्ये चुकीचं काय आहे?, समजतो काय स्वत:ला, काय करणार तू, तुझी लायकी काय? असं विधान त्यांनी केलं होतं.
त्यानंतर ड्रायव्हरनेही तितकंच परखड उत्तर दिलं. तो म्हणाला. हीच तर आमची लढाई आहे की, आमची काहीच लायकी नाही. त्यावर, कलेक्टर म्हणाले की, लढाई अशी असू शकत नाही. कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, तुमच्या सर्व अडचणी ऐकण्यासाठीच तुम्हाला इथं बोलावलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रागावल्याने बैठक काही वेळेसाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर, ड्रायव्हरने माफीही मागितली. तर, जिल्हा प्रशासनानेही आंदोलन शांतीपूर्ण पद्धतीने करा, कुठलाही हिंसाचार करू नका, असे आवाहन ड्रायव्हर्संना केले होते.