लघुशंकेसाठी 'वंदे भारत'मध्ये चढला अन् २०० किलोमीटर लांब पोहोचला; जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 02:55 PM2023-07-20T14:55:30+5:302023-07-20T14:56:47+5:30
Madhya Pradesh News: भारतीय रेल्वे तुमच्या सुविधेसाठी आहे, पण याच्या दुरुपयोगामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.
Madhya Pradesh News: भारतामध्ये रेल्वे, हे दळनवळनासाठी वापरले जाणारे सर्वात मोठे आणि महत्वाचे साधन आहे. भारतीय रेल्वे तुमच्या सोयीसाठी सदैव तत्पर आहे. पण त्याचा चुकीचा वापर तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. रेल्वेचे काही नियम आहेत, पण अनेकदा प्रवासी सर्रासपणे नियम मोडताना दिसतात. पण, मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला एक छोटीशी चूक खूप महागात पडली.
घटना 15 जुलै रोजी सायंकाळची आहे. अब्दुल कादिर नावाच्या व्यक्तीला भोपाळ रेल्वे स्टेशनवरुन ट्रेन पकडून सिंगरौलीला जायचे होते. तो आपल्या पत्नी आणि मुलासह वेळेपूर्वीच स्टेशनवर पोहोचला. अब्दुल कादिरची ट्रेन 8.55 वाजता येणार होती. यावेळी अब्दुल कादिराल जोराची लघुशंका आली. त्याने स्टेशनवरील वॉशरुममध्ये जाण्याऐवजी समोर उभ्या असलेल्या 'वंदे भारत' एक्सप्रेस ट्रेनमध्ये लघुशंकेसाठी गेला.
अब्दुल कादिर 7:24 वाजता ट्रेनमध्ये चढला आणि 7:25 वाजता वंदे भारत इंदूरसाठी रवाना झाली. ट्रेन सुरू झाल्यानंतर अब्दुल घाबरला आणि ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागला. पण, ट्रेनचे दरवाजे ऑटोमॅटिक असल्यामुळे उघडले नाही. अब्दुलने टीटी आणि पोलिसांची मदत मागितली, पण त्याला उत्तर मिळाले की, फक्त ड्रायव्हरच ट्रेनचा दरवाजा उघडू शकतो.
अब्दुलकडे त्या ट्रेनचे तिकीट नव्हते म्हणून टीटीने त्याला 1020 रुपयांचे तिकीट (दंडासह) दिले आणि तो पुढील स्टेशन(उज्जैन)ला उतरला. उज्जैनवरुन त्याने 750 रुपये खर्च करून भोपाळला जाणारी बस पकडली. भोपाळ रेल्वे स्थानकावर त्याची पत्नी आणि मूल त्याची वाट पाहत होते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, अब्दुल कादिर यांनी लघुशंकेसाठी ट्रेनचा वापर केला नसता आणि त्याऐवजी स्टेशन किंवा प्लॅटफॉर्मवर बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाचा वापर केला असता, तर त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले नसते.