विधानसभेची उमेदवारी मिळूनही भाजपचा दिग्गज नेता नाराज; नेमकं काय कारण..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 01:30 PM2023-09-27T13:30:50+5:302023-09-27T13:32:41+5:30
भाजपने मध्य प्रदेश विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे.
Madhya Pradesh Election: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजपने काही खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यात पक्षाचे दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय यांना इंदूरमधून उमेदवारी मिळाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे विजयवर्गीय यांचे म्हणणे आहे.
निवडणूक लढवण्याची इच्छा नाही
तिकीट मिळाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय बडा गणपती चौकात पोहोचले, यादरम्यान ते मंचावरून म्हणाले की, 'पक्षाकडून माझ्या नावाची घोषणा झाल्यावर मी गोंधळलो आणि आश्चर्यचकितही झालो. मी देवासमोर हात जोडून सांगतो की, माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. आता मी मोठा नेता झालोय, मला जाहीर सभा घ्यायच्या आहेत, हेलिकॉप्टर देशभर फिरायचे आहे. लोकांपुढे हात जोडून मतदान मागण्याचा विचार केला नव्हता.'
निवडणुकीसाठी वेगळीच योजना आखली होती
ते पुढे म्हणाले की, 'या निवडणुकीसाठी मी वेगळा प्लॅन केला होता. मी रोज 8 सभा घेईन असे वाटले होते, पण देवाच्या मनात काही वेगळेच होते. मी निवडणूक लढवून पुन्हा जनतेत जावे, अशी देवाची इच्छा आहे. पक्षाने मला उमेदवार केले, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे पक्षाला सांगितले होते, परंतु पक्षाकडून मला काही सूचना मिळाल्या आहेत', असेही ते यावेळी म्हणाले.
गणपतीसमोर भजन गायले
पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कैलाश विजयवर्गीय आपल्या उमेदवारांसह गणपती चौकात पोहोचले, तिथे त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी विजय वर्गीय यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. गणेश मंडपात पोहोचल्यानंतर विजयवर्गीय यांनी भजनही गायले. दरम्यान, कैलाश वर्गीय हे मध्य प्रदेशच्याराजकारणातील एक मोठे नाव आहे. ते भाजपचे दिग्गज नेते आहेत. नुकतीच भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली असून त्यात पक्षाचे चार खासदार आणि तीन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीतही पक्षाने खासदारांना तिकीट दिले आहे.