मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध शेतकरी हात जोडून जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगण घालत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत असलेला शेतकरी न्यायाची याचना करत असून जमीन बळकावणाऱ्या स्थानिक माफियांविरोधात आपली बाजू मांडत आहे.
शंकरलाल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शंकरलाल यांनी आपल्या समस्या सांगताना सांगितले की, भूमाफियांनी जगणे कठीण केले आहे. तहसीलदार चूक करतात, पण शेतकऱ्याला शिक्षा होते. त्यांच्याकडून चुका होतात आणि आम्हाला त्रास होतो.
या शेतकऱ्याने सरकार आणि प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तसेच, येथील अधिकारी भ्रष्ट आहेत, असा आरोप करत आमची अवस्था फार वाईट आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असेही शेतकऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, जनसुनावणीत येणाऱ्या सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात येते, असे जिल्हाधिकारी दिलीप यादव यांनी सांगितले. मंगळवारी जनसुनावणीला अनेक जण आले होते, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवल्या गेल्याचे दिलीप यादव यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या जमिनीबाबत तक्रार होती, ती जागा अजूनही शंकरलाल यांच्या ताब्यात असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या ही जमीन फक्त शंकरलाल आणि त्यांच्या कुटुंबाकडे आहे. खरेदीदाराने अद्याप अर्धीही जमीन घेतलेली नाही, जी पूर्वी जमीन कसणाऱ्यांनी विकली होती, असेही स्थानिक प्रशासनाने सांगितले.
सरकारी तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, सुखड गावात ६०४ आणि ६२५ असे दोन सर्व्हे क्रमांक असल्याचे समोर आले आहे. सर्व्हे क्रमांक ६०४ मध्ये २.५ हेक्टर आणि सर्व्हे क्रमांक ६२५ मध्ये १.०१ हेक्टर जमीन आहे. ही जमीन शंकरलाल आणि त्यांचे कुटुंबियांच्या मालकीची आहे. ज्यामध्ये फुलचंद यांचा मुलगा अनोखिलाल, भगवान भाई आणि रेशम भाई, तसेच घाटी येथील बाबा घाशीराम, कारू लाल, रामलाल, प्रभु लाल, मांगी बाई आणि पार्वती बाई यांचा समावेश आहे.
या जमिनीचा अर्धा हिस्सा ३१ डिसेंबर २०१२ च्या विक्री करारानुसार, मंदसौरचे रहिवासी नारायण राव यांचा मुलगा अश्विन याला विकली गेली. २०१०-११ मध्ये सीतामऊच्या तत्कालीन तहसीलदारांनी या जमिनीच्या हस्तांतरणास मान्यता दिली होती. पण, विकलेली जमीन अजूनही कारूलाल, रामलाल, प्रभुलाल, मांगीबाई आणि पार्वतीबाई यांच्या ताब्यात आहे. ही जमीन ते अश्विनला देण्यास तयार नाहीत.