भोपाळ - मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील रतलाम ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आणि भाजप नेते दिलीप मकवाना यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं. दोन (स्तंभ) खांबांच्यामध्ये आमदार महाशय अडकले होते, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. भाविक बनून देवीच्या मंदिरात मनोकामना पूर्तीसाठी त्यांनी दोन स्तंभातून बाहेर येण्याचा, प्रथा-परंपरेचं अनुकरण केलं. मात्र, त्यावेळी, दोन्ही खांबाच्या मध्ये ते अडकून पडले.
रतलामच्या प्रसिद्ध गुणावद गावातील डोंगरावर हिंगलाज माता आणि महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातच दोन जुने मोठे स्तंभ (खांब) आहेत. ज्यांना पाप-धर्माचे खांब म्हटले जाते. या दोन्ही खांबांमधील अंतर अत्यंत कमी आहे. त्यामुळेच, या दोन्ही खांबाच्या मधून जी व्यक्ती बाहेर निघू शकते ती, पुण्यवान आणि जो त्यातून निघू शकत नाही तो पापी आहे, असे मानले जाते. सुदैवाने, आमदार दिलीप मकवाना हे या दोन्ही खांबाच्या मधून सुखरुपपणे बाहेर आले. मात्र, काही वेळ खांबाच्या मधोमध असतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते दोन्ही खांबाच्या मध्ये अडकले असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, यावेळी ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते.
दरम्यान, सोशल मीडियावर आमदार मकवाना यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. काहींना त्यांना ट्रोल केले. तर, अनेकांनी त्यांच्या आस्थेचं आणि भाविक श्रद्धेचं कौतुकही केलं.