भोपाळ : मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव यांनी धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर परवानगीयोग्य डेसिबल पातळीपेक्षा जास्त करण्यास मनाई जारी करणारे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर उघड्यावर मांसविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच यादव यांनी हे आदेश काढले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजोरा यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांच्या आधारे लाऊडस्पीकरच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वेही तत्काळ अंमलबजावणीसाठी जारी करण्यात आली आहेत. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरचा आवाज आणि डीजे सिस्टीमवरील संगीताच्या आवाजाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक भरारी पथक नेमण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.