Mohan Yadav, New Chief Minister of Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये मंत्री होते. भाजप हायकमांडने मनोहर लाल खट्टर, डॉ. के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांना मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. या निरीक्षकांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना राजकीय विश्रांती देण्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे दोन उपमुख्यमंत्री असतील यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत मोहन यादव?
मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.
मध्य प्रदेशात भाजपाला भरभक्कम विजय
मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. त्याचा निकाल 30 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. निकालात भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला. आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपला 163 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले.
निकालानंतर मुख्यमंत्री कोण, यावर रंगली होती चर्चा
निवडणूक जिंकल्यानंतर सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? शिवराजसिंह चौहान निवडणूक जिंकल्यापासून लोकांमध्ये जात होते. माता-भगिनींना भेटत होते. आपण मध्य प्रदेशातच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पक्षाचा प्रत्येक निर्णय मान्य करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी वारंवार केला होता. या दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या खासदारांनी राजीनामे देऊन हे प्रकरण अधिकच रंजक बनवले होते. त्यामुळे शिवराज यांच्याशिवाय अनेक दिग्गज मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. असे असताना, मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.