MP Assembly Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. आगामी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. अशातच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक ड्युटी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. भोपाळ जिल्हाधिकार्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजेवर बंदी घातल्यानंतर अडीचशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत.
दरम्यान, ड्युटी रद्द करण्यामागे काहींनी आजारपणाचे तर काहींनी घरी लग्न असल्याचे कारण सांगितले. निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय भोपाळ इथे आतापर्यंत दोनशेहून अधिक अर्ज आले आहेत. यातील बहुतांश अर्जांमध्ये आजारपणाचे कारण देत ड्युटी रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. तर, एका कर्मचाऱ्याने भन्नाट कारण सांगत ड्युटी रद्द करण्याची मागणी केली.
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी भन्नाट कारण जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी आदेशाची माहिती दिल्यानंतर कर्मचारी वर्गात खळबळ माजली. एका अधिकाऱ्याने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अंकिता ढाकरे यांना निवडणूक ड्युटी रद्द करण्यासाठी भन्नाट कारण सांगितले. "मेहुणीचे लग्न निवडणुकीच्या तारखेदिवशी आहे आणि त्यासाठी मला रजा हवी आहे", कर्मचाऱ्याची ही मागणी ऐकताच ढाकरे संतापल्या. लग्न सोडून निवडणूक ड्युटी करावी लागेल असे त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्याने अनोखे कारण सांगितले. मेहुणीच्या लग्नाला गेलो नाहीतर घरी तांडवच होईल आणि जगणे कठीण होईल, असे त्याने सांगितले. कर्मचाऱ्याने दिलेला दाखला ऐकून अंकिता ढाकरे यांनी अधिकाऱ्याला त्याचा अर्ज घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यास सांगितले.