"मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही", शिवराज सिंह चौहान यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 04:01 PM2023-12-05T16:01:51+5:302023-12-05T16:20:38+5:30
मी कार्यकर्ता आहे. याबाबत भाजप मला जे काही काम देईल, ते काम मी प्रामाणिकपणे करेन, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय नोंदवला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत राज्यात मंथन सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. तसेच, मी कार्यकर्ता आहे. या संदर्भात भाजप मला जे काही काम देईल, ते काम मी प्रामाणिकपणे करेन, असेही त्यांना सांगितले.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 66 जागांवर विजय मिळवता आला. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, "मोदीजी आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत काम करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. जनतेचा मी मनापासून आभारी आहे. मी शक्य तितके काम केले."
#WATCH | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan says, "...Neither was I CM contender earlier nor now. I am just a party worker and whatever post or duty the party will give I will fulfil that...." pic.twitter.com/AxjDd7pnD5
— ANI (@ANI) December 5, 2023
दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या विजयाचे हिरो म्हणून शिवराज सिंह चौहान समोर आले आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा राज्यातील सत्ताविरोधी लाटेवर मात करत शानदार विजयाची नोंद केली आहे. भाजपच्या या विजयामागे सर्वाधिक चर्चेत असलेली शिवराज सिंह चौहान यांची 'लाडली बहना' योजना ही गेम चेंजर ठरल्याचे म्हटले जाते. मात्र, निवडणुकीपूर्वी पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून सादर केले नाही.
शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराज सिंह चौहान यांनी सर्वाधिक काळ म्हणजे 16 वर्षे 9 महिने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवून इतिहास रचला आहे. ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले असून आता ते पुन्हा एकदा राज्याची कमान सांभाळू शकतात. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांच्या यादीत शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर आहे. 29 नोव्हेंबर 2005 रोजी शिवराज सिंह चौहान पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 2008 आणि 2013 च्या विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले. यानंतर 2018 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली, मात्र यावेळी पक्षाने तसे केले नाही.