भाषणादरम्यान अचानक कोसळला स्टेज, मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:56 AM2024-04-22T09:56:32+5:302024-04-22T09:57:37+5:30
Lok shabha Elections 2024 : ही घटना छत्रसाल परिसरात घडली.
छतरपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांना वेग आला आहे. मध्य प्रदेशात सुद्धा उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार सरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव एक प्रचार सभेदरम्यान भाषण देण्यासाठी स्टेजवर गेले. यावेळी स्टेजवर लोकांची गर्दी वाढली असता स्टेज कोसळला. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना वेळेत स्टेजवरून खाली उतरवले. त्यामुळे मुख्यमंत्री मोहन यादव थोडक्यात बचावले.
ही घटना छत्रसाल परिसरात घडली. मुख्यमंत्री मोहन यादव आणि टीकमगड लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह जेव्हा तात्पुरत्या स्टेजवर भाषण देण्यासाठी गेले. तेव्हा अनेक लोक स्टेजवर चढले. यानंतर मोठ्या गर्दीमुळे स्टेज कोसळू शकतो, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र, तेवढ्यात स्टेजचा कोसळत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्टेजवर पोहोचून त्यांना स्टेजवरून खाली आणले.
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी माईकवरून स्टेज कोसळणार असल्याचे सांगितले होते आणि काही वेळातच स्टेज तुटला. मुख्यमंत्री जिथे उभे होते, तिथे स्टेजचा प्लाय तुटल्याने मुख्यमंत्री पडता-पडता थोडक्यात बचावले. या घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव आपल्या गाडीकडे गेले. दरम्यान, यावेळी स्टेज कोसळला, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
26 एप्रिलला मतदान
स्टेजवरील मोठ्या गर्दीमुळे मुख्यमंत्री मोहन यादव हे खाली उतरले, असे भाजपा आमदार ललिता यादव यांचे पुत्र पक्ष नेते राजेंद्र यादव यांनी सांगितले. मुख्यमंत्री आपल्या पक्षाला पाठिंबा मिळवण्यासाठी रोड शोचे नेतृत्व करण्यासाठी स्टेजवर चढले होते. दरम्यान, टिकमगड जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे.