छिंदवाडा : मध्य प्रदेशात भाजपने मोहन यादव यांना मुख्यमंत्री आणि राजेंद्र शुक्ला-जगदीश देवरा यांना उपमुख्यमंत्री केले आहे. मात्र, अद्याप काँग्रेसने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड केलेली नाही. याबाबत काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी छिंदवाडा येथे आपण निवृत्त होणार असल्याचे मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी म्हटले आहे.
"मी निवृत्त होणार आहे... शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. मध्यप्रदेशात भाजपचे सरकार आले, बघा तुम्हाला किती वीज बिल येईल", असे कमलनाथ म्हणाले. तसेच, भाजपवर हल्लाबोल करताना कमलनाथ यांनी सांगितले की, राज्यात एक कोटीहून अधिक तरुण बेरोजगार आहेत. भ्रष्टाचार इतका आहे की, इथे कोणी उद्योग उभारायला तयार नाही. छिंदवाडा थोडे वाचले आहे कारण इथे लोक मला थोडे घाबरतात.
याचबरोबर, कमलनाथ यांचे पुत्र आणि छिंदवाड्याचे खासदार नकुलनाथ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, कमलनाथ जितक्या मतांनी जिंकले होते, त्यापेक्षा जास्त मतांनी मी यावेळी जिंकेन, यासाठी संकल्प करा. तसेच, आजपासूनच मैदानात उतरा, कारण मोदीजींवर विश्वास नाही. ते लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वीच घेऊ शकतात. आपण लोकसभेत भाजपचा बदला घेऊ, असे नकुलनाथ म्हणाले.
दरम्यान, ३ डिसेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला १६३ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला फक्त ६६ जागा मिळाल्या. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापन करत मोहन यादव यांना मुख्यमंत्री केले. तसेच, राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही केले. रेवाचे आमदार राजेंद्र शुक्ला आणि मल्हारगडचे मंदसौरचे आमदार जगदीश देवरा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.