देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे मध्य प्रदेशवर लागलेलं आहे. या राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. मधल्या दीड वर्षाचा अपवाद वगळता २००३ पासून इथे भाजपाची सत्ता आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये या घडीला मतदान झाल्यास कोण बाजी मारेल, याची ताजी आकडेवारी नव्या सर्व्हेमधून समोर आली आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलनुसार आजच्या घडीला मतदान झाल्यास राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल.
या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार राज्यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार असून, त्यात भाजपाच्या खात्यात ४४ तर काँग्रेसच्या खात्यात ४३ टक्के मतं जाण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यात १३ टक्के मतं जातील. या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर होताना विधानसभेतील २३० जागांपैकी भाजपाला ११५ तर काँग्रेसला ११० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना ५ जागा मिळतील. या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असला तरी भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी एक जागा कमी पडण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ११४, भाजपाने १०९ तर इतरांनी ७ जागा जिंकल्या होत्या.
या सर्व्हेदरम्यान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंदी आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना ४४ टक्के, कमलनाथ यांना ३९ टक्के ज्योतिरादित्य शिंदे यांना ९ टक्के आणि दिग्विजय सिंह यांना २ टक्के लोकांनी पसंती दिली.