Union Minister Prahlad Patel Accident : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (Prahlad Patel) यांचा मंगळवारी (दि.7) अपघात झाला. या अपघातात पटेल थोडक्यात बचावले, त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र या घटनेत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी त्यांचे वाहन अचानक रस्त्यावरुन खाली उतरले. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री पटेल छिंदवाडा येथे आले आहेत. छिंदवाडा येथून जनसंपर्क अभियान आटोपून ते नरसिंगपूरला परतत असताना हा अपघात झाला.
प्रल्हाद पटेल हे नरसिंगपूरमधून उमेदवार आहेतप्रल्हाद सिंग पटेल हे 7 जुलै 2021 पासून भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत. ते मध्य प्रदेशातील दमोह लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1996, 1999, 2014 आणि 2019 मध्येही खासदार झाले. आता भाजपने त्यांना मध्य प्रदेश विधानसभेचे तिकीट दिले आहे.