इंदूर : भाजपने पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश यांचे तिकीट कापल्यानंतर इंदूर-३ मतदारसंघातील समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या ठिकाणीची प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसच्या नवख्या उमेदवारांमध्ये आहे. असे असले तरीही या मतदारसंघावर घराणेशाहीची सावली कायम आहेच.आकाश विजयवर्गीय हे इंदूर-३चे विद्यमान आमदार आहेत. तर स्वत: कैलाश विजयवर्गीय हे इंदूर-१ मधून निवडणूक लढवित आहेत. पक्षाने आकाश यांच्याऐवजी राकेश शुक्ला गाेलू यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने दीपक जाेशी पिंटू यांना तिकीट दिले आहे. राकेश शुक्ला हे इंदूर-१ येथील काँग्रेसचे आमदार संजय शुक्ला यांचे चुलत भाऊ आहेत. दीपक जाेशी हे काँग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार महेश जाेशी यांचे पुत्र आहेत.
राज्याच्या आर्थिक राजधानीत चुरसइंदूर ही मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र, शहरात नागरी समस्या कायम असून, जाेशी यांनी याबाबत आकाश विजयवर्गीय यांच्यावर टीका केली. दुसरीकडे राकेश शुक्ला म्हणाले की, भाजप या भागातील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहे.
मराठी मतदारांची भूमिका निर्णायकइंदूरमध्ये जवळपास ३.५ लाख मराठी मतदार असून त्यांची भूमिका सर्वच मतदारसंघात निर्णायक ठरू शकते.