गटबाजी रोखण्यासाठी खासदारांना उमेदवारी दिली, मध्य प्रदेशात भाजपाचा खेळच उलटा पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 08:10 PM2023-09-30T20:10:35+5:302023-09-30T20:11:07+5:30
हिमाचलप्रदेशमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे.
मध्य प्रदेशमध्येभाजपाने केंद्रातून तीन मंत्री आणि चार खासदार विधानसभा निवडणुकीला लढण्यासाठी पाठविले आहेत. परंतू, हा खेळ आता भाजपाच्याच अंगलट येऊ लागला आहे. गटबाजी रोखण्यासाठी लागू केलेला जालिम उपाय उलटला असून भाजपाच्या नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
हिमाचलप्रदेशमध्ये आलेल्या कटू अनुभवानंतर भाजपाने मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग केल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशात अनेक नेते एकेका जागेसाठी इच्छुक होते. यामुळे गटबाजी होईल आणि त्याचा फटका बसेल असे दिसू लागताच भाजपाने या इच्छुक नेत्यांपेक्षा जास्त वजनदार नेते म्हणजेच खासदारांना उमेदवारी जाहीर करत छोट्या नेत्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, या यादीनंतर भाजपात असंतोषाचे वारे फिरू लागले आहेत. यादी आल्यानंतर चाचौडाच्या ममता मीणा यांनी खासदारांना उमेदवारी दिल्यावने भाजपाचा राजीनामा देत आपचा हात पकडला आहे. सीधी विधानसभा मतदारसंघातूनही आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याजागी खासदार रीति पाठक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्ला यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.
सतनामध्ये चारवेळा खासदार राहिलेल्या गणेश सिंह यांना पक्षाने तिकीट देताच जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर चतुर्वेदी यांनी विरोध दर्शवत राजीनामा दिला आहे. तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मैहरमध्ये ज्योतिरादित्य शिंदे समर्थकाला तिकीट दिल्याने सध्याचे आमदारा नारायण त्रिपाठी नाराज झाले आहेत. त्यांनी विंध्य जनता पक्षाची स्थापना करत भाजपालाच आव्हान दिले आहे.
श्योपुरमध्ये माजी आमदाराला तिकीट दिल्याने जिल्हाध्यक्ष राधेश्याम रावत यांनी मनमानीचा आरोप करत पक्ष सोडला आहे. उज्जैन जिल्ह्यातील नागदा-खचरोदमध्ये तेज बहादुर सिंह यांना उमेदवारी देताच जिल्हा समन्वयक लोकेंद्र मेहता यांनी राजीनामा देत अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.