मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका शेतकऱ्याने सरकारकडे हेलिकॉप्टर मागितल्याची ही अनोखी घटना आता समोर आली आहे. नीमचमधील कनावटी येथील शेतकरी विलास चंद्र पाटीदार यांना दोन वर्षांपासून त्यांच्या शेतात जाता आलेलं नाही. खरंतर त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. या समस्येबाबत विलास हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांपर्यंत आले होते. याच दरम्यान त्यांनी थेट हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
नीमच येथील जनसुनावणीत जिल्हा मुख्यालयात पोहोचलेले शेतकरी विलास चंद्र पाटीदार यांनी सांगितलं की, त्यांचं कनवटी गावात शेत आहे. भूमाफियांनी शेताच्या आजूबाजूला शेती खरेदी करून बाऊंड्री केली आहे. या स्थितीत त्याच्या शेतापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. या समस्येबाबत आपण तहसीलच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, मात्र कोणताही तोडगा निघत नसल्याचं पाटीदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं.
शेतकरी पाटीदार सांगतात की आता त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यांनी पर्यायी मार्ग देण्यासाठी तक्रार केली. यासोबतच निवेदनही देण्यात आले, मात्र या समस्येची दखल घेण्यात आलेली नाही. दोन वर्षांपासून त्यांना त्यांच्या शेतात शेती करता आलेली नाही. त्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विलास यांनी केली आहे. हेलिकॉप्टर देता येत नसेल, तर सरकारने उड्डाणपूल बनवावा, जेणेकरून ते आपल्या शेतापर्यंत पोहोचू शकतील, असंही ते म्हणाले.
पत्र पाहून जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले जिल्हाधिकारी व इतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले. जिल्हाधिकारी दिनेश जैन यांनी संबंधित तहसीलदारांकडे चौकशी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या समस्येवर तोडगा निघेल, अशी आशा विलास यांनी व्यक्त केली आहे. जागेवर अतिक्रमण झाल्याच्या अनेक तक्रारी जनसुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच अमावली महल गावातील लक्ष्मण सिंह, जावद येथील संतोष बाई, जावद येथील रमेश बोहरा यांनी त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.