आपली अनेक बँकेत खाते असतात. यातील काही खाते फक्त नावालाच असतात, या खात्यांवर आपण व्यवहार करत नसतो. पण, अशी खाती आता आपली डोकदुखी ठरु शकतात. सध्या फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असंच एक विचित्र फसणुकीचे प्रकरण मध्यप्रदेशमधून समोर आले आहे. एका शेतकऱ्याचे आयडीएफसी बँकेत खाते आहे, पण मंदसोर एचडीएफसी बँकेतून त्यांच्या खात्यातून करोडो रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. जास्त व्यवहार झाल्यामुळे आता या शेतकऱ्याला नोटीस आली आहे. आता या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी बँकेच्या मॅनेंजरसह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
GST बिल अपलोड करा अन् १ कोटी जिंका, १ सप्टेंबरपासून जबरदस्त योजना होणार सुरू
हे प्रकरण मोरवण गावातील गोविंद लाल कछावा यांच्याशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी मंदसौरच्या एचडीएफसी बँकेची नोटीस शेतकरी गोविंद लाल यांच्या घरी पोहोचली. त्यात त्यांच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे लिहिले होते. नोटीस वाचताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ सरवानिया पोलीस चौकी गाठून तक्रार दाखल केली. यानंतर स्टेशन प्रभारी अस्लम पठाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात आला.
अतिरिक्त एसपी नवल सिंह सिसोदिया यांनी सांगितले की, एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने एका शेतकऱ्याच्या खात्यातून सुमारे २ ते ३ कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले. त्याने आपल्या तीन साथीदारांसह हा मोठा घोटाळा करण्याचा कट रचला. शेतकऱ्याला कर्ज देण्याच्या नावाखाली त्याची कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्याचे खाते उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले. या प्रकरणी पोलिसांनी मंदसौर एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक नरेंद्र राठौर, गोलू शर्मा, दिव्यांश आणि उदित यांना अटक केली आहे. यातील एका तरुणाला नीमचमधून, एकाला मंदसौरमधून आणि दोघांना इंदूरमधून अटक करण्यात आली आहे.
शेतकऱ्याने दिलेली माहिती अशी, आपले खाते आयडीएफसी बँकेत आहे. येथे कर्ज घेण्यासाठी जाऊन आधार कार्डसह इतर कागदपत्रे दिली. यामध्ये दोन धनादेशांचाही समावेश होता. यापैकी एक चेक HDFC मध्ये नवीन खाते उघडण्यासाठी वापरला गेला आणि त्याच्या खात्यातून १०,००० रुपये काढून घेण्यात आले. तक्रार केली असता, पैसे परत केले जातील, असे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बँकेचे पथक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. कर्ज मिळण्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया आहे, असे शेतकऱ्याला वाटत होते. मात्र नोटीस मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अन्य लोकांसह फसवणुकीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.