Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) पदभार स्विकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्य सरकारने मध्य प्रदेशात पुन्हा एकदा बुलडोझर कारवाई सुरू केली आहे. भाजप कार्यकर्त्याचा हात कापणारा आरोपी फारुख रैन उर्फ मिन्नी याच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवण्यात आला आहे. भोपाळ येथील जनता कॉलनी क्रमांक 11 येथे आरोपीचे घर होते. आरोपीवर भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर, यांचे हात कापल्याचा आरोप होता.
काय प्रकरण आहे?5 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आरोपी फारुखने भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता, ज्यामध्ये देवेंद्र ठाकूर यांच्या हाताचा पंजा कापला गेला. देवेंद्र यांना गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आरोपी फारुखचा हबीबगंज पोलिसांच्या गुंडा यादीत समावेश असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फारुख रैन, अस्लम, शाहरुख, बिलाल आणि समीर या पाच आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.
लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णयमोहन यादव यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच आदेशात लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावर अंकुश लावला. या आदेशानुसार धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक निर्धारित डेसिबलपेक्षा जास्त आवाजात वाजताना ऐकू आल्यास त्यावर बंदी घालण्यात येणार आहे. या आदेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देण्यात आला आहे. याशिवाय, यादव यांनी उघड्यावर मांसविक्रीबाबतही कडक आदेश दिला आहे.