एका एका आमदारावर दुसऱ्याला निवडून आणण्याची दिली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 01:27 PM2023-08-20T13:27:35+5:302023-08-20T13:28:18+5:30
अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमधील भाजपचे आमदार भोपाळमध्ये दाखल झाले. प्रत्येक आमदाराला एका विधानसभेच्या जागेची जबाबदारी दिली जाईल. हे.
पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, चार राज्यांतील या भाजप आमदारांसाठी शनिवारी भोपाळमध्ये प्रशिक्षण सत्र सुरू झाले. या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार आहेत. राज्यात एकूण २३० विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी सकाळी आमदारांच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन केले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी पत्रकारांना सांगितले, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे की, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील पक्षाचे आमदार रविवारपासून वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांना भेट देतील. हे आमदार विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी आणि मतदारांशी ते चर्चा करतील.
अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी येथे मध्य प्रदेश सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी करतील. नंतर नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मतदारसंघात ग्वाल्हेर येथे भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवतील. पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीसांना ग्वाल्हेरला पोहोचण्यास सांगितले आहे.