ठरलं? भोपाळमध्ये होणार I.N.D.I.A. आघाडीची पुढील बैठक! संयुक्त रॅलीही काढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:17 AM2023-09-05T11:17:31+5:302023-09-05T11:18:11+5:30
I.N.D.I.A. Alliance: मुंबईनंतर आता इंडिया आघाडीची पुढील बैठक मध्य प्रदेशात होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
I.N.D.I.A. Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला चितपट करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ‘जुडेगा इंडिया, जितेगा भारत’ या घोषवाक्याखाली एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने एकत्रित लढण्याचा निर्धार करत अनेक मुद्दे मार्गी लावण्यात आले. मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीची पुढील बैठक मध्य प्रदेशातीलभोपाळमध्ये होऊ शकते, असे म्हटले जात आहे. बैठकीसह विरोधी पक्षांची एक संयुक्त रॅली काढली जाऊ शकते. या माध्यमातून विरोधक शक्तिप्रदर्शन करू शकतात, असे म्हटले जात आहे.
इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. त्यानंतर दुसरी आणि तिसरी बैठक अनुक्रमे बंगळुरू आणि मुंबईत पार पडली. या बैठकीला २८ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यानंतर आता पुढील बैठकीच्या आयोजनावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पुढील बैठक भोपाळमध्ये घेण्यावर व्यापक एकमत झाले होते, परंतु बैठकीची कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही आणि पुढील बैठकीची रूपरेषाही अद्याप तयार केलेली नाही. संसदेचे विशेष सत्र घेण्यात येत आहे. संसदेच्या विशेष सत्रानंतर भोपाळ येथे बैठकीचे आयोजन केले जाऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.
I.N.D.I.A. ची चौथी बैठक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता
NDA विरोधात एकत्रितपणे लढण्यासाठी इंडिया आघाडी योजना आखत आहे. या आघाडीची पुढील बैठक ऑक्टोबरच्या सुरुवातीला होऊ शकते, असे म्हटले जात आहे. एनडीए नेते त्यांच्या पुढील बैठकीसाठी दिल्लीचा पर्याय म्हणून विचार करत आहेत. इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी शक्य तितके एकत्र लढण्याचा आणि जागांचा ताळमेळ बसवण्याचा संकल्प केला होता. विरोधकांच्या इंडिया आघाडीने एनडीएच्या विरोधात विविध ठिकाणी एकत्रित रॅली काढण्याचा विचार केला आहे.
दरम्यान, मुंबईतील बैठकीत जागा वाटपाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित करण्यात आला आहे. बैठकीत इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच जागा वाटप, निवडणुकीचा प्रचार-प्रसार, सभा, शिबिरे यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या. देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळे पक्ष आणि वेगवेगळे प्रश्न असल्याने जागा वाटपाची चर्चा प्रत्येक राज्यस्तरावर करण्याबाबत या बैठकीत एकमत झाले आहे. त्यानुसार लवकरच राज्यस्तरावर जागा वाटपाची चर्चा सुरू करून अंतिम जागा वाटप निश्चित केले जाणार आहे. आघाडीने नियुक्त केलेली समन्वय समिती या जागा वाटपावर लक्ष ठेवणार आहे.