हृदयद्रावक! मुलीला जन्म देताच महिला न्यायाधीशाचा मृत्यू; नवजात बालकाचे छत्र हरपलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:49 PM2024-01-20T18:49:51+5:302024-01-20T18:50:07+5:30
मुख्य न्यायदंडाधिकारी पद्मा राजोरा यांचे प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने निधन झाले.
मध्य प्रदेशातील खरगोन येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मुख्य न्यायदंडाधिकारी पद्मा राजोरा यांचे प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आपल्याला एक मूल असावं अशी त्यांची इच्छा होती पण दुर्दैवाने मुलीचे तोंडही न पाहता त्यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी आयव्हीएफ तंत्राद्वारे नवजात मुलीला जन्म दिला. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्या चार दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी लढत होत्या पण अखेर त्यांचा मृत्यू झाला.
महिला न्यायाधीशांच्या निधनाची बातमी समजताच वकील आणि नातेवाईकांनी तीव्र शोक व्यक्त केला. वकिलांनी सांगितले की, पद्मा या मागील तीन वर्षांपासून खरगोनमध्ये तैनात होत्या. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती ठीक नसल्याने ८ जानेवारी रोजी त्यांनी रजा घेतली. त्यानंतर दोन दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्यानंतर त्यांना येथून इंदूरला रेफर करण्यात आले. मात्र, त्यांनी खरगोनमध्येच नवजात बाळाला जन्म दिला होता आणि तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती.
नवजात बालकाचे छत्र हरपलं
दरम्यान, ५१ व्या वर्षी प्रसूती, अशक्तपणा आणि कावीळ यामुळे त्यांची प्रकृती ढासळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९७३ रोजी झाला. त्या इंदूर येथील रहिवासी होत्या. न्यायालयीन कर्मचारी सांगतात की, १४ जुलै २०२१ रोजी सीजेएम न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. महिला न्यायाधीश पद्मा राजोरे आपल्या कामाबद्दल जागरूक होत्या आणि गरोदरपणातही त्या कोर्टात येत होत्या. पद्मा राजोरे यांनी जवळपास ९ महिनेच काम केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मा यांनी खरगोन येथेच मुलीला जन्म दिला पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना इंदूरला रेफर करण्यात आले तिथे त्यांचा मृत्यू झाला.