मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनतेचे सुख आणि दु:ख हेच माझे सुख-दु:ख असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी मी अहोरात्र झटत आहे. विकासपर्व अंतर्गत संपूर्ण राज्यात विकासाचा महायज्ञ राबविण्यात येत आहे. अनेक बांधकाम व विकास कामांची पायाभरणी व भूमिपूजन केले जात आहे. रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सिंचनासाठी पाणी, विविध योजनांच्या माध्यमातून सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे असं म्हटलं आहे. चकल्दीच्या विकास पर्व कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चकल्दीमध्ये 81 कोटींहून अधिक रकमेच्या विकासकामांचे उद्घाटन/भूमीपूजन करण्यात आले आणि महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, पूर्वी सिंचनाची व्यवस्था नसल्याने उत्पादन कमी असायचे. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी देण्याचे काम अनेक सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून केले जात आहे.
चकल्दी येथे आज उद्घाटन करण्यात आलेल्या पट्टलाई उपसा सिंचन योजनेतून पाटतलाई, अमीरगंज आणि पलासपानी या डोंगराळ गावातील शेतांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून तीन गावातील 661 शेतकऱ्यांची 889 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. जमोनिया आणि चतरकोटा सिंचन योजनांचेही आज भूमिपूजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हळूहळू विविध सिंचन योजनांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जाईल. यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता नर्मदेचे पाणी घरोघरी पोहोचवले जात आहे.
एकेकाळी या संपूर्ण भागात जाण्यासाठी रस्ते नव्हते. कुठेही फिरायला पूर्ण दिवस लागायचा. याठिकाणी चांगले रस्ते बांधले जातील हे जनतेला अनाकलनीय होते. आता चौफेर भव्य रस्त्यांचे जाळे पसरले आहे. शेतातील रस्तेही केले जातील. गेल्या 50 वर्षात जितके रस्ते बांधले नाहीत तितके रस्ते आपल्या सरकारने बांधले आहेत असं देखील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.