PM Modi on Sanatan Controversy: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बुधवारी मध्य प्रदेशातील बिना येथे पोहोचले. यावेळी मोदींनी 50,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सनातनवर सुरू असलेल्या वादावरुन विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर निशाणा साधला.
यावेळी पीएम मोदी म्हणाले की, काही पक्ष समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संस्कृतीवर हल्ला करणे हाच त्यांचा उद्देश आहे. विरोधी आघाडी भारताचा सनातन धर्म नष्ट करू इच्छिते. भारतीयांच्या श्रद्धेवर हल्ला करणे, ही विरोधी आघाडीची रणनीती आहे. या लोकांना सनातनची परंपराच संपवायची आहे. त्यांना सनातनचा नाश करुन देशाला 1000 वर्षे गुलामगिरीत ढकलायचे आहे. मात्र त्यांचे मनसुबे एकजुटीने हाणून पाडावे लागतील.
मोदी पुढे म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांच्यात नेतृत्वाबाबत संभ्रम आहे. लोक या आघाडीला अहंकारी आघाडी म्हणतात. भारताच्या संस्कृतीवर आघात करणे, हे या अहंकारी आघाडीचे धोरण आणि रणनीती आहे. या आघाडीने भारतीयांच्या श्रद्धेवर हल्ला करण्याचे ठरवले आहे. भारताचे विचार आणि मूल्ये नष्ट करण्याचा या अहंकारी आघाडीचा हेतू आहे.
अहंकारी आघाडी सनातनच्या परंपरा संपवण्याचा संकल्प घेऊन आली आहे. ज्या सनातनवर महात्मा गांधींनी आयुष्यभर विश्वास ठेवला, ज्या सनातनने त्यांना अस्पृश्यतेविरुद्ध आंदोलन करण्यास प्रेरित केले. ती सनातन परंपरा या अहंकारी आघाडीच्या लोकांना संपवायची आहे. त्यांना सनातनचा नाश करायचा आहे. आपल्याला अशा शक्तींना एकत्रपणे रोखायचे आहे. एकजुटीच्या बळावर त्यांचे मनसुबे उधळून लावायचे आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.