तरुणांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास, संपूर्ण जगाला भारताचा अभिमान - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 09:25 PM2023-10-21T21:25:33+5:302023-10-21T21:25:54+5:30
ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.
ग्वाल्हेर : देश आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. हे पूर्णपणे अभूतपूर्व आहे. आपल्या देशाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. २३ ऑगस्ट रोजी आपला देश चंद्रावरील अशा ठिकाणी पोहोचला, जिथे आजपर्यंत कोणताही देश पोहोचू शकला नव्हता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ग्वाल्हेर किल्ल्यावर असलेल्या सिंधिया शाळेच्या १२५ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, "२०१४ मध्ये जेव्हा त्यांना प्रधान सेवकाची जबाबदारी मिळाली, तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर केवळ क्षणिक लाभ किंवा दीर्घकालीन विचार करून काम करणे. आमच्या सरकारला १० वर्षे झाली. सरकारने दीर्घकालीन नियोजनाचे निर्णय घेतले. हे निर्णय अभूतपूर्व आहेत. आज देशाचे यश शिखरावर आहे. आपल्या देशाचा संपूर्ण जगाला अभिमान आहे. २३ ऑगस्ट रोजी भारत चंद्रावर अशा ठिकाणी पोहोचला जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकला नव्हता."
याचबरोबर, याआधी केवळ सॅटेलाइट सरकारद्वारे बनवले जात होते किंवा परदेशातून आणले जात होते, परंतु त्यांच्या सरकारने स्पेस सेक्टरसोबत डिफेन्स सेक्टर तरुणांसाठी खुले केले आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, तरुणांना मेक इन इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आणि नेहमी चौकटीबाहेरचा विचार करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले. याशिवाय, भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी आहे. आज जागतिक फिनटेक अॅडॉप्शन रेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. गगनयानच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आज देशासाठी काहीही अशक्य राहिलेले नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
गरीबी दूर होईल आणि देश विकसित बनेल
केंद्र सरकारच्या योजनांचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, गरिबीला दूर करुन आपला देश विकसित होईल. आज भारत सर्व काही मोठ्या प्रमाणावर करत आहे. स्वप्ने आणि संकल्प दोन्ही मोठे असली पाहिजे. तुमचे स्वप्न खरंतर माझा संकल्प आहे. जेथे संधींची कमतरता नाही, असे वातावरण निर्माण केले पाहिजे. तरुणांच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. या सर्वांचा दृढनिश्चय यशाकडे नेईल. येणारी २५ वर्षे प्रत्येकासाठी महत्त्वाची आहेत, तितकीच देशासाठीही महत्त्वाची आहेत. तसेच, आमच्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतल्याचेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.