‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 05:28 AM2023-08-13T05:28:58+5:302023-08-13T05:29:58+5:30

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

pm narendra modi slams opposition in madhya pradesh tour | ‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान

‘त्यांना’ आता मिळतोय सन्मान; मागच्या सरकारांना निवडणुकीतच येत होती आठवण: पंतप्रधान

googlenewsNext

सागर (मध्य प्रदेश) : आपल्या सरकारच्या कार्यकाळातच मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासी यांना योग्य सन्मान मिळू लागला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. आधीच्या सरकारांनी या वर्गांची उपेक्षाच केली; केवळ निवडणुकीच्या काळातच त्यांची आठवण काढली जात होती, असेही मोदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बडतुमा येथे महान संत व समाज सुधारक संत रविदास यांच्या मंदिर-सह-स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. १०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे करण्यात येणार आहे. मोदी म्हणाले की, मागच्या सरकारांनी गरिबांना साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले नाही. आपल्या सरकारच्या जल जीवन मिशनमुळे आता दलितांच्या वस्त्या, ओबीसींचे भाग आणि आदिवासी क्षेत्रात नळाद्वारे पाणी मिळत आहे.

११ एकरवर उभे राहणार मंदिर व स्मारक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत रविदासांचे मंदिर व स्मारक ११ एकर जागेवर उभे राहणार आहे. हे स्मारक संत रविदास यांच्या शिकवणुकीचे प्रदर्शन करेल. यात एक संग्रहालय, आर्ट गॅलरी आणि अन्य सुविधांसह निवासी व्यवस्था असेल.

विराेधकांनी ‘लोकसभेतून पळ काढला’

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी ‘लोकसभेतून पळ काढला’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१२) करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी देशभरात जी नकारात्मकता पसरविली आहे त्याचा आमच्या सरकारने प्रतिकार केला, असेही त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील पंचायती राज परिषदेला ऑनलाइन संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, मणिपूरवरील चर्चेत विरोधक गंभीर नव्हते. कारण, यामुळे त्यांना अधिक नुकसान झाले असते. विरोधी पक्षांनी लोकहितापेक्षा त्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिले.

‘त्या’ लोकांवर कारवाई नाही  

सरकारने ईशान्येकडील राज्यातील अत्याचारात सहभागी असलेल्या लोकांवर कोणतीही कारवाई केली नाही. तेथे १६०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामीण निवडणुकांमध्ये भाजपने १५ ते १६ लोकांची हत्या केली. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पं. बंगाल.

...त्यांना फक्त राजकारणाची काळजी

विरोधी पक्षांना लोकांच्या वेदना आणि त्रासाची पर्वा नाही. त्यांना फक्त राजकारणाची काळजी आहे. त्यामुळेच त्यांनी चर्चा टाळण्याचा निर्णय घेतला आणि अविश्वास प्रस्ताव आणून राजकीय चर्चेला प्राधान्य दिले. १४० कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने केंद्र सरकारने संसदेत विरोधी पक्षांच्या अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला. देशातील जनतेसमोर विरोधी पक्षांचा पर्दाफाश करा. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.


 

Web Title: pm narendra modi slams opposition in madhya pradesh tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.