PM मोदींचा भोपाळ दौरा ठरला! ‘वंदे भारत’चे लोकार्पण; १० लाख बुथ कार्यकर्त्यांना संबोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 08:00 AM2023-06-21T08:00:05+5:302023-06-21T08:00:35+5:30
PM Narendra Modi Bhopal MP Visit: अमेरिकेहून आल्यानंतर पंतप्रधान मोदी भोपाळ दौऱ्यावर जाणार असून, भाजपने जय्यत तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
PM Narendra Modi Bhopal MP Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर आहेत. तिथून मायदेशात परत आल्यावर पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशमधीलभोपाळ येथे जाणार आहेत. भाजपकडून या दौऱ्याच्या जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. २७ जून रोजी पंतप्रधान मोदी भोपाळ येथे जाणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधन, लोकप्रिय वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण असे अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील रानी कमलापति स्टेशनवरून पंतप्रधान मोदी दोन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भोपाळ ते इंदोर आणि भोपाळ ते जबलपूर अशा दोन वंदे भारत ट्रेनचे यावेळी लोकार्पण करण्यात येणार आहेत. आताच्या घडीला मध्य प्रदेशमधून दिल्लीला जाणारी वंदे भारत ट्रेन सुरू आहे. या दोन वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणानंतर मध्य प्रदेशला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहेत. याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी गोवा-मुंबई, बंगळुरू-हुबळी आणि पाटणा-रांची या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे म्हटले जात आहे.
१० लाख बुथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार
भोपाळ दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी १० लाख बुथवर डिजिटल रॅलीला संबोधित करतील. यासोबतच ते सर्व लोकसभा मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून ५-५ कार्यकर्त्यांना भोपाळला बोलावण्यात आले आहे. पीएम मोदींच्या दौऱ्यात समाविष्ट असलेला प्रस्तावित रोड शो तूर्तास रद्द करण्यात आला आहे. आता पंतप्रधानांचा रोड शो होणार नाही, असे सांगितले जात आहे.