इंदूर : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान, सोमवारी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल यांनी सोमवारी इंदूरमध्ये भाजपाच्या जाहीरनाम्यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोदी सरकारच्या कामांची माहिती देत प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
राहुल गांधींना हिंदी येत नाही, त्यामुळे भाजपाने निवडणूक जाहीरनामा इंग्रजी भाषेत सुद्धा तयार केला आहे, असा टोला प्रल्हाद पटेल यांनी लगावला आहे. तसेच, राहुल गांधींना भाजपाचे संकल्प पत्र नीट वाचण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय, राहुल गांधींच्या आजींनी ५० वर्षांपूर्वी गरिबी हटावचा नारा दिला होता. गरिबी हटवली असती तर गेल्या १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर आली असती, असे प्रल्हाद पटेल म्हणाले.
याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० जागांवर विजयाचा झेंडा फडकवेल, असा दावा त्यांनी केला. यावेळी छिंदवाड्यातही कमळ फुलणार आहे. भाजपाचा उमेदवार विजयी होईल, असे सांगत काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यावरही निशाणा साधला. कमलनाथ यांच्या घरी हेलिपॅड बनवले आहे. कमलनाथ यांच्या हेलिकॉप्टरची माहिती घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असे प्रल्हाद पटेल म्हणाले.
कमलनाथ यांच्यावर प्रल्हाद पटेल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. प्रल्हाद पटेल म्हणाले की, भ्रष्टाचार रोखण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि निवडणूक आयोगाला एकत्र काम करावे लागेल. या देशात निवडणूक आयोगाच्या वरती कोणीही नाही. तपासात सर्वांनी सहकार्य करावे. लोकसभा निवडणुकीच्या काळात शेवटच्या दिवसात फक्त पैशासाठी लढाई होत असते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संकल्प पत्र प्रसिद्ध केले.